फोटो आयडीशिवाय मतदानाचा हक्क देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:33+5:302021-07-18T04:28:33+5:30
कल्याण : कोरोनामुळे दीड वर्षे लांबणीवर पडलेली केडीएमसीची निवडणूक तिसरी लाटेचा अंदाज घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच जाहीर होण्याची ...
कल्याण : कोरोनामुळे दीड वर्षे लांबणीवर पडलेली केडीएमसीची निवडणूक तिसरी लाटेचा अंदाज घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत फोटो असलेले मतदान ओळखपत्र असल्याशिवाय मतदानाचा हक्क देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री व प्रधान सचिवांकडे केली आहे.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघात तीन लाख ७५ हजार १५६ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार ९२ मतदारांचे छायाचित्रे यादीत नाही. त्यापैकी मृत मतदारांची संख्या ९९४ आहे. याशिवाय कोरोनाकाळात १४ हजार ९८३ मतदार स्थलांतरित झाले आहेत. मतदारांनी त्यांच्या फोटोसह मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असा कार्यक्रम निवडणुकीपूर्वी राज्य निवडणूक आयोगामार्फत राबविला जातो. परंतु, अनेक मतदार त्यांचा फोटो देत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ज्यांच्याकडे फोटो असलेले ओळखपत्र नसेल, अशाकडून बोगस मतदान केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस मतदानामुळे उमेदवारांचे चांगलेच फावते. लोकशाहीच्या निकोप निवडणूक प्रक्रियेला त्यामुळे हरताळ फासला जातो. फोटो असलेल्या मतदान ओळखपत्रामुळे बोगस मतदानाला वाव राहत नाही. त्यामुळे हे ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करायला देऊ नये, याकडे निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
----------