गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 06:52 AM2022-09-16T06:52:39+5:302022-09-16T06:52:49+5:30
संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा.
ठाणे : गर्दीच्या वेळेमध्ये दिव्यातून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी उपनगरी रेल्वेच्या गाड्या अधिक असाव्यात. वातानुकूलित (एसी) लोकल गर्दीच्या वेळी नकोच. मोबाईल चोरट्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशा सूचना उपनगरी रेल्वे प्रवासी संघटना तसेच काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे रेल्वे सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये गुरुवारी केल्या.
संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी केले. आगामी काळात साजरा होणारा ईद ए मिलाद तसेच नवरात्रौत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा समितीच्या बैठकीचे गुरुवारी आयोजन केले होते.
थेट रेल्वे स्थानकात जाऊन कांदे यांच्यासह प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी संवाद साधला. त्यावेळी वातानुकूलित लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवासी म्हणाले. काही प्रवाशांनी नियमित वेळापत्रकांमध्ये बदल न करता वातानुकुलित लोकल दुपारच्या वेळेस चालविण्यास हरकत नसल्याचे सांगितले. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्याचा सल्ला देशमुख यांनी दिला. दिवा येथून गर्दीच्या वेळेत अप मार्गावर (मुंबईकडे) जादा लोकल सोडाव्यात तर मुंब्रा येथे पूर्वीप्रमाणेच जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा.
...तर पाेलीस हेल्पलाइनची मदत घ्या
प्रवासात काही समस्या उद्भवल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२, तसेच रेल्वे सुरक्षा बल हेल्पलाइन नंबर १३९ यांच्यामार्फत मदत घ्यावी, असा सल्ला पोलिसांनी प्रवाशांना दिला.