सोनावणी नको रे बाबा!; नगरसेवकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:23 PM2020-02-23T23:23:59+5:302020-02-23T23:24:15+5:30
विशेष अधिकारीपदी नेमण्याच्या हालचाली
उल्हासनगर : सेवानिवृत्त झालेले नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांना विशेष अधिकारी पदावर नियुक्ती करण्याच्या घडामोडी महापालिका वर्तुळात सुरू आहेत. त्यांची एकूणच पार्श्वभूमी विचारात घेता सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी सोनावणी नको रे बाबा अशी भूमिका घेत विरोध दर्शविला आहे.
उल्हासनगर पालिकेचा नगररचनाकार विभाग नेहमीच वादात राहिला आहे. यापूर्वीच्या बहुतांश नगररचनाकारांना चुकीचे बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागली असून ताराणी नावाचे नगररचनाकारांना लाच घेताना अटक झाली होती. तर संजीव करपे हे नगररचनाकार गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. तत्कालिन आमदार ज्योती कलानी यांनी एकाच दिवशी १६ पेक्षा जास्त बांधकाम परवाने दिल्याचा प्रश्न उपस्थित करून करपे कोंडी केली होती.
यामध्ये प्रसिद्ध गृहसंकुलाचा समावेश आहे. सोनावण्ी यापूर्वी नगररचनाकार राहिले असून गॅस पंपाच्या परवान्यासाठी पैसे माागितल्याचा आरोप झाला होता. तसेच बांधकाम पूर्ण न झालेल्या वादग्र्रस्त गृहसंकुलांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्याचा आरोप झाला होता.
३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगररचनाकार विभागाचा कारभार ठप्प पडला असून भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार श्रीकांत देव यांच्याकडे प्रभारी पदभार दिला. मात्र देव महापालिकेत काम करण्यास इच्छुक नाहीत. तसेच राज्य सरकारने अध्यादेशानुसार बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण करण्यासाठी सेवानिवृत्त नगररचनाकार सोनावणी यांना मानधनावर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा डाव काही नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांनी आखल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
बांधकाम नियमित करण्याच्या प्रक्रियेत एका वास्तूविशारदाच्या बनावट सहीचे अर्ज आल्याने प्रक्रिया वादात सापडली आहे. सोनावणी यांची उल्हासनगर पालिकेतील एकूणच कारकिर्द वादग्रस्त ठरली असून, त्यांचे अनेकांना कटु अनुभव आल्याने त्यांच्या नेमणुकीस विरोध होत आहे.
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता
राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागविले जात आहेत. १५ हजारापेक्षा जास्त अर्ज आॅनलाइनद्बारे आले असून त्यामध्ये काही अर्ज वास्तूविशारदाच्या बनावट सहीचे असल्याचे उघड झाले.
या प्रकाराने प्रक्रिया वादात सापडली असून वादग्रस्त अधिकारी यांची विशेष अधिकारीपदी नियुक्ती केल्यास संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.