पाण्याची चिंता नको! मोडकसागर धरण पूर्ण भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:29 AM2020-08-19T04:29:56+5:302020-08-19T06:52:50+5:30
जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.
ठाणे : जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी पावसाची रिपरिप होती. जिल्ह्यात सरासरी ६९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर वाढलेला दिसून आला.त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण मंगळवारी रात्री ९.२४ वाजता पूर्ण क्षमतेने भरले धरणाखालील ४२ गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मोडक सागर धरणातून दररोज मुंबईला सुमारे ४४० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी-अधिक असून, धरण क्षेत्रात मात्र तो वाढलेला आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, आंध्रा, मोडकसागर आदी गेल्या वर्षी १०० टक्के भरलेले होते.
यंदा धरण क्षेत्रात पावसाला विलंब झाला आहे. आता बारवीत ७५.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. याप्रमाणेच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८६.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी धरणातमंगळवारी ६२ मिमी पाऊस पडला.
>तानसा-वैतरणातही
८९ टक्के पाणीसाठा
बारवी धरणाची पाणीपातळी आता ६९.६० मीटर झाली आहे. धरणात अजून तीन मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. भातसात मंगळवारी ८५.५६ टक्के पाणीसाठा झाला असून धरणात ८८ मिमी पाऊस पडला. तर आंध्र धरणात २९ मिमी पाऊस पडल्याने ५६ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ६९ मिमी पाऊस पडला. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तानसात ९५ मिमी पाऊस पडला असून ८९ टक्के साठा तयार झाला आहे. मध्यवैतरणा धरणात ३९ मिमी पाऊस पडला असता या धरणात आतापर्यंत ८९.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.