दुसरा डोस मिळण्यास उशीर झाला तरी काळजी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:17+5:302021-05-08T04:42:17+5:30
टेम्प्लेट आहे अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे दुसरा ...
टेम्प्लेट आहे
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. ठरावीक कालावधीत दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही, लस आपल्या शरीरात काम करीत असते. त्यामुळे घाबरून न जाता उशिरा झाला तरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
ठाण्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुरुवातीला हेल्थ वर्कर, त्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील नागरिक आणि आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाची मोहीम जिल्ह्याच्या ठिकाणी कोलमडून पडली आहे. कुठे कोविशिल्डचा साठा अपुरा पडत आहे, तर कुठे कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी दुसरा डोस दिला जात असून, काही ठिकाणी केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जात आहे. परंतु दुसरा डोस मिळविण्यासाठी नागरिक पहाटे ५ वाजेपासून रांगा लावत आहेत. दिवसाला अनेक केंद्रांवर कुठे ५०, तर कुठे ८० जणांनाच टोकन दिले जात आहे. त्यामुळे उर्वरिताना घरी जावे लागत आहे. काहींनी मार्च महिन्यात पहिला डोस घेतला. त्यानंतर चार ते सहा आठवड्यात दुसरा डोस घ्यावा, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले होते. परंतु जवळ जवळ दोन महिने उलटून गेले तरी लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक निराश झाले आहेत.
त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांचे आणखी हाल झाले आहेत. काहींनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असल्याने केवळ लसींचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना दुसरा डोस घेता आलेला नाही. दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर कोरोना होण्याची भीती त्यांच्या मनात घर करू लागली आहे. परंतु घाबरण्याचे काही कारण नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. दुसरा डोस घेण्यात काही दिवस मागे पुढे झाले तरी त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
पहिला डोस घेतल्यानंतर यापूर्वी २८ दिवस थांबावे लागत होते. परंतु आता शासनाने गाइडलाइन्स बदलल्या असून, त्यानुसार पहिला डोस घेतल्यानंतर किमान चार ते सहा आठवडे थांबून दुसरा डोस घेता येऊ शकतो. त्यामुळे किमान सहा आठवडे दुसरा डोस घेण्यासाठी थांबावे असे सांगण्यात आले आहे.
पहिला डोस घेतलेले आरोग्यसेवक - ९२,१९१
दुसरा डोस घेतलेले आरोग्यसेवक - ५३,४०५
पहिला डोस घेतलेले फ्रन्टलाइन वर्कर - ८३,६४५
दुसरा डोस घेतलेले फ्रन्टलाइन वर्कर - ३९,८०४
पहिला डोस घेतलेले ज्येष्ठ नागरिक - ३,७०,०३४
दुसरा डोस घेतलेले ज्येष्ठ नागरिक - १,२४,८०१
पहिला डोस झालेले ४५ वर्षांवरील नागरिक - ४,६१,७६१
दुसरा डोस झालेले ४५ वर्षांवरील नागरिक - ५२,३७६
............
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस थांबावे लागते, तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवस थांबावे लागते. परंतु यातही कुठे मागे पुढे झाले तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण ही लस शरीरात आपल्या परीने काम करीत असते, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर प्रतिकारक्षमतेत वाढ होते. परंतु उशीर झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे
........
वाचली