थुंकणाऱ्यांना समाज प्रबोधनाचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:36+5:302021-03-08T04:37:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्याचे गंभीर परिणाम संसर्गाच्या माध्यमातून होतात, हे गेल्या अनेक वर्षांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्याचे गंभीर परिणाम संसर्गाच्या माध्यमातून होतात, हे गेल्या अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. सद्यस्थितीला वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांकडून घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहनही वेळोवेळी केले जात आहे. यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे, परंतु एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, पान, गुटखा, तंबाखू किंवा अन्य कारणाने रस्त्यावर थुंकण्याची प्रवृत्ती आजच्या घडीलाही कायम आहे. सरकारी यंत्रणांकडून या विरोधात ठोस कारवाई होत नसताना, जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या मनीषा मंदार दीक्षित यांचे थुंकणाऱ्यांविरोधात व मास्क न वापरणाऱ्यांविरोधात सुरू असलेले प्रबोधनाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
वय वर्षे ५० असलेल्या दीक्षित यांचे बालपण मुलुंडमध्ये गेले. लग्नानंतर त्या डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागात स्थायिक झाल्या. एक माणूस म्हणून जगताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून त्यांचे हे काम सुरू आहे. दिव्यांग असल्याने त्यांना कुठे प्रवास करायचा असेल, तर तो रिक्षातूनच होतो. त्यामुळे ज्या रिक्षातून त्या नेहमी प्रवास करायच्या, त्या रिक्षाचालक काकांनाही थुंकण्याची सवय होती, परंतु दीक्षित यांनी त्यांची ही सवय मोडीत काढली. आजही ज्या ठिकाणी कोणी थुंकत असेल, तर त्यालाही चुकीच्या वागणुकीबाबत त्या हटकतात. चुकीचे दिसले की मला राहवत नाही. त्या विरोधात न घाबरता मी नेहमीच आवाज उठवते. काहींना माझी कृती आगाऊपणाची वाटते, परंतु रस्त्यावर न थुंकणे, मास्क लावणे यात समाजाबरोबर आपलेही वैयक्तिक हित आहे, याची जाणीव प्रत्येक नागरिकाला हवी, असे त्या आवर्जून सांगतात. आपल्या संस्कृतीत निसर्गाला देव मानले जाते. त्याची पूजा करण्याचे, त्याला मान देण्याचे संस्कार आई, वडील आणि घरातल्या मोठ्या व्यक्ती लहानपणापासून करत असतात. लहानपणी सकाळी उठल्यावर ‘समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णूपत्नी नमस्तुभ्यम पदस्पर्शम क्षमस्व मे’ हा श्लोक म्हणायला शिकवतात. आपण दिवसभर अत्यंत खंबीरपणे घट्ट पाय रोवून ज्या जमिनीवर उभे राहणार असतो, तिला विष्णूपत्नी म्हणजे साक्षात लक्ष्मी समजून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून, त्या जमिनीची क्षमा मागून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करावी, हे संस्कार एकीकडे आणि त्याच जमिनीवर घाण टाकून वेळप्रसंगी तिच्या अंगावर थुंकून आपण तिचा क्रूर अपमान करतो, हा मोठा विरोधाभास आपल्याकडे पाहायला मिळतो. थुंकण्याचे वाढते प्रमाण पाहता, हागणदारीमुक्त गाव किंवा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासारखी एखादी योजना कार्यान्वित करावी, असे दीक्षित यांचे म्हणणे आहे.
दीक्षित यांच्याप्रमाणेच त्यांची आत्येबहीण वीणा जोशी यांचेही या प्रकारे काम सुरू असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून थुंकणाऱ्यांना दंड ठोठावून थुंकण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे शक्य असल्याचे जोशी सांगतात. ज्या महिलांची अशा प्रवृत्तींविरोधात खऱ्या अर्थाने काम करण्याची तयारी आहे, त्यांना एखादे ओळखपत्र देऊन त्यांच्या कार्याचा जनजागृतीसाठी उपयोग करून घ्यावा, याकेडी त्या लक्ष वेधतात.
-----------------------------------------------------
मनीषा दिक्षीत फोटो आहे