स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, रुग्णसंख्या ६६ च्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:49 PM2022-07-28T18:49:56+5:302022-07-28T18:52:59+5:30
Swine Flu : बुधवारी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
ठाणे : कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूच्या रुग्णातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. अवघ्या दोन दिवसात स्वाईनच्या रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही जिल्ह्यात रुग्ण वाढ होत असतांना ठाणे शहरात या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. परंतु या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. असे असताना, दुसरीकडे स्वाईन फ्लू या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या बाधित रुग्णांची संख्या ३४ इतकी होती. तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशी स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या थेट ६६ वर गेली आहे. असे असले तरी या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मात्र, जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये ठाणे महापलिका हद्दीत सर्वाधिक ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिकेत रुग्णांची संख्या ९ वरून १८ इतकी झाली आहे. नवी मुंबईत दोन रुग्णांची वाढ झाल्याने तेथील रुग्णांचा आकडा ५ वर गेला आहे. तसेच बुधवार पर्यंत एकही रुग्णांची नोंद नसलेल्या मिरा भाईंदरमध्ये एका रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे स्वाईन फ्लू या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दुपट्टीने वाढ होत आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र, जैसे थे आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. तर, स्वाईन फ्लू या आजाराने मात्र, आरोग्य यंत्रणांची झोप उडाली असून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.