निलयला दुहेरी यशाची हुलकावणी, तनिष पेंडसेची चमकदार कामगिरी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 17, 2023 03:32 PM2023-10-17T15:32:28+5:302023-10-17T15:33:22+5:30
या स्पर्धेतील मुलांच्या १३ वर्षे वयोगटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : खेतवानी स्मृती ठाणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनीस स्पर्धेत आजचा दिवस बूस्टर अकॅडमीसाठी यशदायी ठरला. त्यांच्या निलय पट्टेकरला दुहेरी यशाने हुलकावणी दिली तर तनिष पेंडसेने दुहेरी मुकूट संपादन केला. सीकेपी सोशल क्लबच्या सभागृहात सुरु असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या १३ वर्षे वयोगटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली.
गटात तिसरे मानांकन मिळालेल्या निलय समोर अव्वल मानांकित प्रो टेबल टेनिस अकॅडमीच्या प्रतीक तुलसानीचे आव्हान होते. प्रतिकने पहिला गेम ११-६ असा जिंकत आश्वासक सुरुवात केली. पण निलयने चिवट झुंज देत दुसरा गेम १२-१० आणि तिसरा गेम ११-६ जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. चौथा गेम ३-११असा जिंकत प्रतिकने सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक पाचव्या गेममध्ये प्रतिकने आक्रमक खेळ करत वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण निलयनेही शांत खेळ करत ३-८ अशा पिछाडीवरून ९-९ अशी गुणांची बरोबरी साधली. त्यानंतर खेळातली गती वाढवत दोघांनीही विजयासाठी शिकस्त केली. त्यात निलयने १३-११ अशी बाजी मारत पाचव्या गेमसह अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.
१५ वर्षे वयोगटातील उपांत्यपूर्व लढतीत अग्रमानांकन मिळालेल्या एस टेबल टेनिस अकॅडमीच्या प्रत्युश बाऊआला पराभूत केल्यामुळे निलयकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण अंतिम फेरीत मात्र निलयला त्या खेळाची पुनरावृत्ती साधता आली नाही. बुस्टर अकॅडमिच्याच तनिष पेंडसेने निलयचा ११-५,११-७, ११-८ असा सरळ पराभव करत स्पर्धेतील पहिले यश निश्चित केले. त्यानंतर १७ वर्षे वयोगटाच्या विजेतेपदाच्या लढतीत प्रत्युश बाऊआने तनिषसमोर आव्हान उभे करण्याचा अयशस्वी केला. १५ वर्ष वयोगटातील विजयामुळे लय सापडलेल्या तनिषने प्रत्युशची लढत ११-३,१२-१०, ९-११,१३-१२ अशी मोडून काढत स्पर्धेतील दुसरे यश साध्य केले.