एसटीच्या आर्थिक उत्पन्नात दुपटीने वाढ; दीड हजार कर्मचारी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:53 PM2022-04-22T18:53:52+5:302022-04-22T18:54:12+5:30

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे.

Doubling of ST's financial income; One and a half thousand employees returned | एसटीच्या आर्थिक उत्पन्नात दुपटीने वाढ; दीड हजार कर्मचारी परतले

एसटीच्या आर्थिक उत्पन्नात दुपटीने वाढ; दीड हजार कर्मचारी परतले

googlenewsNext

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर कर्मचारी वर्गाची पावले पुन्हा कामाकडे वळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागात गेल्या १० ते १२ दिवसांत तब्बल एक हजार ५२४ कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे संपकाळात दिवसाला २० ते २५ हजार कि.मी. धावणारी लालपरी आता सरासरी ६० ते ७० हजार कि.मी. धावू लागल्याने एसटीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होऊन ते ४० ते ५० लाखांच्या घरात पोहोचले आहे.

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांच्या पगारवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते, तर  २२ एप्रिलपर्यंत कामावर जाण्याची सूचना न्यायालयाच्या माध्यमातूनही करण्यात आली होती. तिचे पालन करून बडतर्फ केलेले, सेवासमाप्ती झालेले कर्मचारी एसटी सेवेत पुन्हा येण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र एसटी ठाणे विभागात दिसून येते. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे एक हजार ५२४ कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती एसटी विभागाने दिली. ठाणे एसटी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक सर्व मिळून एकूण दोन हजार ७५८ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत एक हजार ५२४ कर्मचारी हजर होते. यामध्ये ३१९ चालक, ३५८ वाहक, चालक कम वाहक ६७८, कार्यालयीन कर्मचारी ६ आणि कार्यशाळेतील ६३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संपकाळात ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. कर्मचारी कामावर परतल्याने बसफेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. बसफेऱ्या वाढल्याने ४० ते ५० लाखांचे उत्पन्न ठाणे विभागाला मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

रस्त्यावर धावत आहेत ४४६ बस 

ठाणे विभागीय क्षेत्रात ५१८ एसटी बसची संख्या आहे. त्यापैकी सध्याच्या घडीला ४४६ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात संपाच्या काळात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता, दिवसभरात केवळ २० ते २५ हजार कि.मी. बसचा प्रवास होत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तो वाढून एक लाख ३१ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नातही भर पडली आहे.

Web Title: Doubling of ST's financial income; One and a half thousand employees returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.