लढा कोरोनाशी : डबलिंग रेट गेला ४७ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:06 AM2020-08-05T03:06:53+5:302020-08-05T03:07:13+5:30
लढा कोरोनाशी : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची माहिती
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णवाढीचा दर आता नऊ दिवसांवरून ४७ दिवसांवर गेला आहे. आॅगस्टच्या अखेरीस हा डबलिंग रेट ६० दिवसांवर जाऊ शकतो. त्यानंतर कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण महापालिका हद्दीत आणखी कमी झाल्याचे दिसून येईल, असा दावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे.
जूनच्या मध्यंतरीस व जुलैच्या सुरुवातीस कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी मनपाने काही हॉटस्पॉट जाहीर केले होते. तेथे नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली होती. जुलैमध्ये घेतलेल्या १७ दिवसांच्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. ३० जूनला डबलिंग रेट हा नऊ दिवस होता. आता तो ४७ दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्याही स्थिरावली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. डबलिंग रेट ६० दिवस झाल्यावरच रुग्णसंख्या आणखी नियंत्रणात येऊ शकते. डबलिंग रेटचा कालावधी वाढविणे हे तसे आव्हानात्मक काम आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. १५ जुलैपर्यंत २० हजार रुग्णसंख्या होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, उपाययोजना केल्याने २० हजार रुग्णसंख्या ही आॅगस्टमध्ये झाल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सगळ्यात सुखद बाब म्हणजे मनपा हद्दीत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी १५ हजार १०५ रुग्ण बरे झालेले आहेत. टाटा आमंत्रा हे महापालिकेचे सगळ्यात मोठे कोविड केअर सेंटर असून, तेथून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. एकूण रुग्णसंख्या ही २० हजारांवर पोहोचली आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात साडेपाच हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५ हजारपेक्षा जास्त रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचे श्रेय आरोग्य विभागाचे आहे, असे आयुक्त म्हणाले.
६०० बेडची व्यवस्था
च्शास्त्रीनगर रुग्णालयात सुरुवातीला कोविड रुग्णालय सुरू केले होते. तेथे केवळ ५२ बेडची सुविधा होती. त्यामुळे मनपाने होलीक्रॉस, आर. आर. रुग्णालय आणि नियॉन रुग्णालय अधिग्रहित केले. त्यानंतर जंबो सेटअपद्वारे डोंबिवली क्रीडा संकुलात आणि पाटीदार हॉलमध्ये कोविड रुग्णालय सुरू केल्याने बेडची संख्या वाढली.
च्सध्या मनपाकडे ५५० आॅक्सिजन व ५० आयसीयू बेड आहेत. त्यात १० आॅगस्टपर्यंत कल्याणमधील काळसेकर शाळेत, फडके मैदान येथील आर्ट गॅलरीत आणि डोंबिवली जिमखाना येथे कोविड रुग्णालय सुरू होईल. तेथे एकूण २०० आयसीयू व ४०० आॅक्सिजन बेड वाढणार आहेत. या सुविधा रुग्णांना उपलब्ध होताच १० आॅगस्टनंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढेल, असा दावा आयुक्तांनी केला आहे.