हुंड्यासाठी छळ : विवाहितेची आत्महत्या, पतीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 08:51 PM2017-08-02T20:51:50+5:302017-08-02T20:51:50+5:30
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. पतीकडून ५० हजारांच्या हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून कांचन दुधियापथर (३०) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोलशेत येथे घडली. याप्रकरणी तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पती सतीश दुधियापथर (३३) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर, आईचा मृत्यू आणि वडिलांना तिच्या मृत्यूप्रकरणी अटक झाल्याने आठवर्षीय मुलगा आणि पाचवर्षीय मुलगी ही दोन मुले मात्र पोरकी झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कांचन आणि सतीश या दोघांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणे होत होती. तो कचºयाच्या घंटागाडीवर, तर ती एक खासगी शाळेच्या बसवर मदतनीस म्हणून नोकरीला होती. माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठीही तो तिला वारंवार धमकावत होता, अशी तक्रार तिचा उल्हासनगर येथील भाऊ शिवकुमार उज्जनवाल याने कापूरबावडी पोलिसांकडे केली आहे. कोलशेतच्या मरीआई चाळीत राहणारे हे दाम्पत्य २८ जुलै रोजी त्यांच्या पुतण्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गायमुख, कासारवडवली येथे गेले होते. तिथून ते रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले. तेव्हाही त्यांच्यात पुन्हा किरकोळ वाद झाला. याच वादातून त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली. दारूचे व्यसन असलेल्या पतीकडून वारंवार होणाºया छळाला कंटाळून तिने अखेर रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती सुमारे ८० टक्के भाजली. तिला रबाळे, नवी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, ३१ आॅगस्ट रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त होऊन भाऊ शिवकुमार याने कापूरबावडी पोलिसांकडे तिला होणाºया छळाची कैफियत मांडून १ आॅगस्ट रोजी फिर्याद दाखल केली. या तक्रारीनंतर पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.