‘डॉ. कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज’मध्ये केडीएमसी शाळेतील १० विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:16 AM2021-01-16T00:16:04+5:302021-01-16T00:16:23+5:30
मराठीतून प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेश झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेज २०२१ साठी कलाम फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी महापालिका शाळेतील १० विद्यार्थ्यांना मार्टिन ग्रुपतर्फे दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांना उपक्रम बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जे.जी. तडवी यांनी दिली.
दहा मुलांचा हा चमू पुण्यातील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात उपग्रह बनविण्याच्या उपक्रमात सहभागी होणार आहे. हा चमू १९ जानेवारी रोजी पुण्याला जाणार आहे. पालिकेच्या बारावे शाळेतील विद्यार्थी पंढरीनाथ शेळके, प्रथमेश घावट, बल्याणी शाळेतील बुशारा सऊदआलम, कशीश शेख, तिसगाव शाळेतील माणिक राठोड, सुजल गोठणकर, उंबर्डे शाळेतील गौतम इंगोले, अफरोज शेख, नेतीवली शाळेतील नवाज शेख, दीप कडव या दहा विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या प्रक्रियेत हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाविषयी या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हा उद्देश आहे. मराठीतून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत. हेलियम बलून म्हणजे काय, पेलोड क्यूब्ज म्हणजे काय, उपग्रह अभ्यासासाठी कोणते सेन्सर वापरले जातात, याची माहिती विद्यार्थ्यांना मराठीतून दिली जाणार आहे.
प्रकल्पामुळे अवकाशातील शेती संशोधनास होणार मोलाची मदत
जगातील सगळ्यात कमी वजनाचे अर्थात २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार करून ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ते बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. हे उपग्रह एका केसमध्ये फिट असतील. त्याला पॅराशूट, जीपीएस सिस्टीम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून पृथ्वीवरील ओझोन, हवेची शुद्धता, प्रदूषण याची माहिती पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. पेलोडसोबत काही झाडांची बीजे पाठविली जातील. त्यामुळे कृषी क्षेत्राला अवकाशातील शेती संशोधनास मदत मिळू शकते.