डॉ. बेडेकर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला मुख्यध्यापकांचा कृतज्ञता सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 03:19 PM2020-12-14T15:19:41+5:302020-12-14T17:13:28+5:30

डॉ. बेडेकर विद्या मंदिराचे मुख्यध्यापक प्रकाश पांचाळ यांचा कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला.

Dr. Alumni of Bedekar Vidya Mandir celebrated the appreciation ceremony of the headmaster | डॉ. बेडेकर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला मुख्यध्यापकांचा कृतज्ञता सोहळा

डॉ. बेडेकर विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला मुख्यध्यापकांचा कृतज्ञता सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांनी साजरा केला मुख्यध्यापकाचा कृतज्ञता सोहळामार्कांची भूक, ज्ञानाची तहान मात्र हरवलेली - प्रदीप ढवळपिटीचे शिक्षक मुख्याध्यापक झाले - अभिजित पानसे

ठाणे : डॉ. बेडेकर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांची ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती आहे. त्या निमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या या लाडक्या शिक्षकाचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. विशेष म्हणजे या सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते आणि प्रमुख पाहुणेही माजी विद्यार्थीच होते. यावेळी माजी विद्यार्थी, ज्येष्ठ लेखक प्रदीप ढवळ यांनी हल्ली केवळ मार्कांची भूक आहे , ज्ञानाची तहान मात्र हरवली असल्याची खंत व्यक्त केली तर माजी विद्यार्थी, दिगदर्शक अभिजित पानसे यांनी पिटीचा शिक्षक मुख्याध्यापक बनतो म्हणून वर्गाचे छप्पर आकाश बनत या शब्दांत पांचाळ यांचे कौतुक केले.

रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे हा सोहळा मोजक्याच आजी माजी शिक्षक - विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रकाश पांचाळ आणि त्यांच्या पत्नी आरती पांचाळ यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर पांचाळ यांची हलकीफुलकी मुलाखत माजी विद्यार्थी सर्वेश शेंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी पिटी शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास सर्वांसमोर उलगडला. मी एका कोकणातल्या छोट्या गावातून मुंबईत आलो. हा प्रवास अशक्य होता. पण आपल्या गुणांची झलक ही दिसत असते. शिक्षण आणि संस्कार हे अतूट नाते आहे. संस्कार ही महत्त्वाची गुरुकिल्ली आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावी. त्यावेळचे विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी यात खूप फरक जाणवत आहे हे सांगताना त्यांनी उदाहरणे दिली. शैक्षणिक धोरणात बदल होणे गरजेचे आहे. मूल पहिलीतून दुसरीत जाते तेव्हा त्याला पहिलीत काय येत होते यांचे मूल्यांकन होत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्याला जसा आकार देऊ तसा तो घडत जातो. हल्ली समाज बंदिस्त झालाय, या बंदिस्त समाजात मूल कुठे जात आहे हे कळत नाही आणि याचे वाईट वाटत आहे. शाळा कधी विसरता येत नाही. जे पेरतो तेच उगवले जाते असे सांगताना सेवानिवृत्तीनंतर पुढील इतर क्षेत्रांत काम करण्याची इच्छा पांचाळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, माजी विद्यार्थी कौशिक साष्टे यांनी त्यांची मिमिक्री केली, यात सेजल रांगळे हिने शिक्षिकेची भूमिका केली.

प्रा. ढवळ म्हणाले की, १९७८ चा मी विद्यार्थी असून हा सोहळा पाहिल्यावर त्या काळच्या बेडेकरचा धावता प्रवास समोर आला. बेडेकर शाळेत चिटणीस सर होते त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना भेटता आले. बेडेकरमुळे माझ्यावर मोलाचे संस्कार झाले. माजी विद्यार्थी असा उत्सव करत असतील तर ते त्या शिक्षकांचे संस्कार असतात. शिक्षकांचे बँक बॅलन्स हा विद्यार्थी असतो. शिक्षकांच्या प्रवासात चांगले विद्यार्थी भेटतात तेच त्यांचा अभिमान असतात. पांचाळ हे कोकणातून आले आहेत. कोकणने महाराष्ट्राला अनेक हिरे दिले आहेत.

दिग्दर्शक पानसे म्हणाले की, मैदानात खेळणारा शिक्षक मुख्याध्यापक होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. आज दप्तराच्या ओझ्याखाली विद्यार्थी आहेत अशी खंत व्यक्त करीत बेडेकर शाळेला छोटे का होईना पण मैदान आहे. विद्यार्थी हा शाळेच्या बाहेर गेल्यावर कळतो असेही ते म्हणाले. माजी विद्यार्थी , दिगदर्शक, अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती म्हणाले की, आई आणि शाळा हे दोन्ही संस्कार करीत असतात. आई ही घरात तर शाळेत शिक्षक संस्कार करतात. मंदिरातील देवाप्रमाणे शिक्षक असतात आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असे विद्यार्थी असतात असेही ते म्हणाले. यावेळी पांचाळ यांचा फेटा, शाल, श्रीफळ, पुस्तक सुप्रसिद्ध चित्रकार सतीश खोत यांनी रेखाटलेले त्यांचे अर्कचित्र आणि ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, माजी शिक्षक दीपक धोंडे, आजी शिक्षिका उज्ज्वला धोत्रे, माजी पालक प्रतिनिधी केदार बापट तसेच, पांचाळ यांची बहीण आणि शाळेची माजी विद्यार्थिनी विभा पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान माजी विद्यार्थी प्रणव दांडेकर यांनी आपल्या पखवाज वादनातून ताल चौताल सादर केले. यावेळी त्यांना अक्षय कुबल यांनी साथसंगत दिली. रविवारी पांचाळ यांचा वाढदिवस असल्याने माजी विद्यार्थ्यांनी केक कापून तो साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्येश बापट, प्रज्ञा मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास सहभागी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या माजी शिक्षिका मंजिरी दांडेकर,व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड, सुप्रसिद्ध चित्रकार सतीश खोत,माजी विद्यार्थी डॉ. अभिजित जाधव, सचिन - सुमित सिंग यांचे आभार मानले.

Web Title: Dr. Alumni of Bedekar Vidya Mandir celebrated the appreciation ceremony of the headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.