राज्यस्तरीय लोकनाट्य स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 06:12 PM2017-11-01T18:12:15+5:302017-11-01T18:12:24+5:30
यशराज कला मंच डोंबिवली तर्फे आयोजित राज्यस्तरीय लोकनाट्य स्पधेर्ची अंतिम फेरी मंगळवारी बालभावन डोंबिवली पूर्व येथे जल्लोषात पार पडली.
डोंबिवली: यशराज कला मंच डोंबिवली तर्फे आयोजित राज्यस्तरीय लोकनाट्य स्पधेर्ची अंतिम फेरी मंगळवारी बालभावन डोंबिवली पूर्व येथे जल्लोषात पार पडली.या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते वगसम्राट वसंत अवसरकीर यांचा पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे स्मृती लोकगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रंगमंचावर वावरताना कलाकारांनी शिस्त पाळली पाहिजे तसेच लोकनाट्य कलावंताकडे हजरजबाबीपणा येण्यासाठी तीक्ष्ण निरीक्षण शक्ती आवश्यक आहे असे प्रतिपादन सावरकर यांनी केले. यास्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्पर्धकांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत अंतिम फेरी साठी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर या ठिकाणच्या पाच संघांनी सहभाग घेतला होता. गौरव मूर्ती वसंत अवसरिकर यांनी तरुण कलावंतांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हि लोकनाट्य परंपरा जपणे आता तुमच्याच हातात आहे. लोकनाट्याचा अर्थ त्याची सदारीकरणाची पद्धत आजच्या तरुणांनी नीट समजून घेऊन सादर केली पाहिजे तरच हि आपली अस्सल मातीतील रांगडी लोककला टिकेल व वाढेल. विवेक ताम्हनकर यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अवसरिकर यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक मधुकर चक्रदेव, लक्ष्मी नारायण संस्थेचे माधव जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे डोंबिवली अध्यक्ष दिलीप गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.डोंबिवली शहरातील नाट्य क्षेत्रातील अनेक नाट्य प्रेमींनी लोकनाट्याचा आस्वाद घेतला.
अंतिम फेरी निकाल: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग यांस प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक -अभिजीत प्रॉडक्शन,मुंबई. सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम - किशोर धडाम, द्वितीय - नीलम वाघमारे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - सुमेध साळवे, द्वितीय - किशोर धडाम. सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार - नीलम वाघमारे, द्वितीय - अजिंक्य पितळे, तृतीय - राजेश घाडीगांवकर. सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार - डॉली घोगशे, द्वितीय - प्रिया उंटवाल, तृतीय - मंजू गंगावणे. सर्वोत्कृष्ट वादक - विक्रम पवार, सर्वोत्कृष्ट नृत्यकलावंत - ऐश्वर्या पवार, द्वितीय - मंजू गंगावणे आदींना सन्मानित करण्यात आल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.