डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:18 AM2023-12-06T09:18:21+5:302023-12-06T09:18:41+5:30
आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते
प्रकाश जाधव
मुरबाड : मुरबाड तालुक्यात १९ मे १९४१ रोजी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामोपचाराने हा वाद मिटविला. ज्या खुर्चीत बसून डॉ. बाबासाहेबांनी हा वाद सोडविला ती खुर्ची आजही शहरातील कौशिक अनंत भराडे यांच्या घरी जतन करून ठेवण्यात आले आहे. ही खुर्ची तालुक्यात सातत्याने समानतेची प्रेरणा देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २० मे १९४१ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हेदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
आमचे वडील अनंत भराडे यांनी वकिली केली होती. त्यामुळे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात होते. आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते. त्यांनी याच खुर्चीवर बसून न्यायनिवाडा केला होता. - कौशिक अनंत भराडे, मुरबाड.
१९ मे १९४१ रोजी फौजदारांची, गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून अनुसया दोंदे व सोनाबाई घायवट यांचा काही सवर्णांशी वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेबांनी मुरबाडला येऊन हा वाद मिटवला. हा इतिहास ‘माता भीमाई’ पुस्तकाचे लेखक योगेंद्र बांगर यांनी मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे.