डॉ. बेडेकर विद्यामंदिरने गाजवला रविवारचा अभिनय कट्टा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:26 PM2020-01-13T17:26:06+5:302020-01-13T18:09:09+5:30
माझी शाळा या उपक्रमांतर्गत डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
ठाणे: डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण सादर करुन रविवारचा अभिनय कट्टा चांगलाच गाजविला. माझी शाळा या उपक्रमांतर्गत अभिनय कट्ट्यावर आपला प्रवास मांडण्याचा पहिला मान अभिनय कट्ट्याला मिळाला. यात शाळेने आपला वृत्तांत सादर करीत माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या गरुड झेपेचेही तोंडभरुन कौतुक केले तर उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीही शाळेप्रती असलेले ऋण व्यक्त केले.
अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या माझी शाळा या उपक्रमाचा पहिला प्रयोग रविवारी पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला, शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व्यक्त केलेले ऋण, खुमासदार निवेदन, शिक्षकांचे मनोगत, शाळेचा प्रवास नि टाळ््यांचा कडकडाट याने कट्टा चांगलाच दणाणून गेला. श्रेयस साळुंखे या विद्यार्थ्याने रॉबरी या विषयावर, ईशान चांगणे यांनी मनातला पालकांबद्दलच्या संवादाचे सादरीकरण केले. योगेश दामले याच्या तबला वादनाची तर वेदांत जामगावकर याच्या ढोलकी वादनाची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णलीला, आठवीच्या विद्यार्थ्यांनी सेव्ह डॉटर या विषयावर सादरीकरण केले तर सातवीच्या विद्यार्थींनी लावणी सादर करुन टाळ््यांची दाद मिळवली. यावेळी डॉ. विजय बेडेकर यांच्या पत्नी सुमेधा बेडेकर यांनी माझ्या शाळेतल्या मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण कौतुकास्पद हे मी आज पाहिले आणि याचा मला आनंद झाला आहे. शिक्षकांच्या योगदानाबद्दल सांगताना मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी विद्यार्थ्यांचेही कौतुक केले. शाळेत एका कुटुंबाप्रमाणे सगळे शिक्षक काम करत आहेत. हे कुटुंब जेव्हा काम करते तेव्हा उत्तम शाळा घडते आणि त्या शाळेचे नाव म्हणजे डॉ. बेडेकर विद्या मंदिर असे पांचाळ यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रेम आपल्या मुलासारखे विद्यार्थ्यांवर करतात. संस्काराचे बाळकडू हे शाळेतूनच मिळतात. या बाळकडूमूळे आम्ही इथपर्यंत प्रवास केला. शाळा कुणी विसरु शकत नाही असे शाळेचे माजी विद्यार्थी आणि अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष नाकती यांनी यावेळी सांगितले. शाळेच्या शिक्षिका, निवेदिका साधना जोशी यांनी खुमासदार शैलीत निवेदन करुन उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी सुमेधा बेडेकर, पांचाळ, जोशी यांच्यासह शाळेचे माजी शिक्षक दीपक धोंडे, उज्ज्वला धोत्रे, कल्पना वाघुले, पुनम देवघरे, कल्पना बोरवणकर यांचा तसेच, माजी विद्यार्थ्यांचाही कट्टयातर्फे सन्मान करण्यात आला.