डॉ. चारुदत्त शिंदे यांची पुन्हा प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:06+5:302021-04-29T04:32:06+5:30
ठाणे : ठाण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर पुन्हा ...
ठाणे : ठाण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ठाणे महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर पुन्हा डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती केली. बुधवारी ते सेवेत रुजू झाले. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस त्यांची अशाच प्रकारे नियुक्ती करण्यात आली होती.
ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर हे पद रिक्त होते, त्याचवेळेस महापालिकेतील डॉ. वैजयंती देवगीकर यांची प्रभारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती; परंतु ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य सेवेवर ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत येथे उच्च दर्जाचा अधिकारी असावा, अशी भूमिका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. चारुदत्त शिंदे यांची प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश काढताच शिंदे हे बुधवारपासून सेवेत रुजू झाले, तर देवगीकर यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर नियुक्त करण्यात आले.
दरम्यान, कोरोनाच्या पहिला लाटेत शिंदे यांची १० जून २०२० रोजी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; परंतु त्यांनी चांगली कामगिरी केली नसल्याचेच दिसून आले होते. तसेच फारशी छाप पाडली नव्हती. असे असताना पुन्हा त्यांनाच या पदावर का आणण्यात आले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
...........