ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ. वेणीमाधव उपासनी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:40 AM2021-03-19T04:40:04+5:302021-03-19T04:40:04+5:30
डोंबिवली : ज्ञानेश्वरी, भागवत मुखोद्गत असलेले आणि गायत्री मंत्राचे अनेकदा पुरश्चरण केलेले उपनिषदांचे अभ्यासक डॉ. वेणीमाधव उपासनी उर्फ अच्युतानंद ...
डोंबिवली : ज्ञानेश्वरी, भागवत मुखोद्गत असलेले आणि गायत्री मंत्राचे अनेकदा पुरश्चरण केलेले उपनिषदांचे अभ्यासक डॉ. वेणीमाधव उपासनी उर्फ अच्युतानंद सरस्वती (८७) यांचे गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले.
अनेक महिन्यांपासून ते पश्चिमेकडील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. शहरातील असंख्य आध्यत्मिक, सामाजिक संस्थावर ते कार्यरत होते. पश्चिमेकडे असलेल्या शुक्ल यजुर्वेदिय माध्यादिन ब्राम्हण संस्थेचे ते अनेक वर्षे विश्वस्त, अध्यक्ष होते. त्या संस्थेशी १९७५ पासून त्यांचा सबंध होता. गणेश मंदिर संस्थानचेही ते माजी अध्यक्ष होते.
संत ज्ञानेश्वरी, भागवत त्यांना मुखोद्गत होते. उपनिषदांचा त्यांचा अभ्यास प्रचंड दांडगा होता. संस्कृत भाषेवर पकड होती. अध्यात्म विषयात अनुभवी, गुरूपदाला पोहोचलेले असे थोर व्यक्तिमत्त्व होते. ठाणे जिल्ह्यात तसेच राज्यातील ग्रामीण भागामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात शिष्यगण होता. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी प्रदीप जोशी गुरुजी यांनी दिली. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय संस्थेच्या वतीने अनेक जोशी, ॲड. हेमंत पाठक, विलास देशपांडे, पं. दिनेश उपासनी, विलास जोशी, महेश शुक्ल यांसह शहरातील दिग्गजांनी व सामाजिक, अध्यात्मिक संस्थांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
--------------------
प्रतिक्रिया :
डॉ. वेणीमाधव उपासनी यांचा शुक्ल यजुर्वेदिय मध्यादिन ब्राह्मण सभा डोंबिवली संस्थेशी १९७८ पासून संबंधित होते. संस्थेच्या जागेवर एक खोली आणि शेड होती. उपासनी अध्यक्ष झाले आणि त्यांच्या प्रोत्साहनाने संस्थेच्या ज्ञानेश्वर कार्यालयाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. संस्था त्यांची सदैव ऋणी राहील. उपासनी यांच्या निधनाने संस्थेने एक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांचा पेंढरकर महाविद्यालयाच्या उभारणीतही सहभाग होता.
- विलास देशपांडे
---------
प.पू. स्वरुपानंद सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन अच्युतानंद सरस्वती हे नाम धारण केले. अखेरपर्यंत श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा ठेवून निजधामाला निघून गेले. अशा स्वरुपमग्न योग्यास भावपूर्ण श्रध्दांजली.
- प्रदीप जोशी
------------
आपल्यातील ज्येष्ठ, श्रेष्ठ व सर्वाभिमुख नामांकित डॉक्टर तसेच भागवताचार्य आपल्याला सोडून गेल्याने समाजात पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे अशक्य आहे.
- मुकुंद जोशी
-----------
डोंबिवलीतील अनेक समस्यांवर उपासनी यांनी मार्ग दाखवला. अनेक संस्थांचे अथक काम केले. बापूंना अखिल भारतीय कीर्तन कूल संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
- महेश शुक्ल
-----------
‘त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव’ असे आमचे गुरूसम डॉ. वे. श्री. उपासनी आम्हाला आज पोरके करून गेले. डॉ. सुनीत, सुनीती , सुविद्य वहिनी व लेक जावई आणि असंख्य सुह्रुद यांचा आधार गळून पडला. त्यांनी संस्थापित केलेल्या संस्थांचे संवर्धन करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- सुधीर कुलकर्णी
------------
वाचली