डॉ. क्षितिज कुलकर्णी यांना नाट्य श्री' पुरस्कार प्रदान
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 12, 2022 04:44 PM2022-09-12T16:44:31+5:302022-09-12T16:44:54+5:30
पु.ल.देशपांडे सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्काराचे मानकरी गौरव संभुस
ठाणे : अजेय संस्था आयोजित झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ विद्यालंकार सभागृहात पार पडला. यावेळी डॉ.क्षितिज कुलकर्णी यांना ‘नाट्य श्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला तर यंदाच्या पु.ल.देशपांडे सर्वोत्तम विनोदी अभिनेता पुरस्काराचे मानकरी गौरव संभुस ठरले. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी इतर विभागांतून देखील पुरस्कार देण्यात आले. राजस वैद्य, केशवकुमार, क्षमा वाखारकर. उमा रावते यांना गुरुवर्य केशवराव मोरे स्मृती सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार, हर्षल चव्हाण, कार्तिक हजारे, आकाश जाधव यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार, अपर्णा संत, सुमित चोडणेकर, तुषार मोहिते, आकाश जाधव यांना झपूर्झा मैत्र पुरस्कार, पवन वेलकर, हेमांगी कुळकर्णी संभुस, अवधूत यरगोळे यांना झपूर्झारत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावरकर म्हणाले की, कलाकार आणि विदूषक ह्यातला फरक समजून घेत शिस्तीने वाटचाल करणे महत्त्वाचे असते. कारण नट हा कलाकार असतो. पैसे मिळत जातात म्हणून काहीही काम करू नये, मनाला पटेल तेच करावे असा कानमंत्र त्यांनी दिला.
दरम्यान, बसून बोलेल तो नट कसला ' ह्या वाक्याने उभे राहून मनोगताला सुरूवात करताना उभे राहून बोलले की मनातील प्रामाणिक भावना नेमक्या यावेळी शब्दझपूर्झा या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मनोरंजना बरोबरच विचार ही शब्दझपूर्झा अंकातून आपल्या समोर येत आहेत असे प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी सोळांकूरकर यांनी सांगितले. 'मनोरंजन कधी युती कधी कट्टी' या विषयावर सोळांकूरकर यांनी संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी केले आहे. जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी झपूर्झा मध्ये जिव्हाळा असल्याचे सांगत कवितेचे सादरीकरण केले. व्यास क्रीएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी शब्दझपुर्झाबद्दल आपले मनोगत मांडले.
दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ज्येष्ठ अभिनेते सावरकर, ज्येष्ठ कवी म्हात्रे, कवी सोळांकुरकर, प्रकाशक गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सई लेले, अभिनेत्री सुनीता फडके, लेखिका मेघना साने, कवी विजय जोशी, कवी रामदास खरे, कवी विकास भावे आदींच्या उपस्थितीत पुरस्कारवितरण सोहळा पार पडला. झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव १६ सप्टेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे दुपारी ४.३० पासून सुरू होत असल्याची माहिती यावेळी दिली. निवडक मोफत प्रवेशिकासाठी ९९३०१७५५२७, ८९२८८६४१७१, ९८६७९८५२०९, ७२०८६८८२३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.