डॉ महेश बेडेकर यांचे कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन - अल्टीमेट ह्युमन रेसमध्ये यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:02 PM2024-06-10T19:02:37+5:302024-06-10T19:02:50+5:30
ही स्पर्धा ९ तास ७ मनिटात पूर्ण करून रॉबर्ट मित्सली पदक प्राप्त केले.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : दक्षिण आफ्रिकेत होणारी 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण मॅरेथॉन समजली जाते. यावर्षी ९ जुनला ही स्पर्धा पडली. ठाण्याचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ् डॉ. महेश बेडेकर यांनी देखील सहभाग घेऊन हि स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली . त्यांनी ही स्पर्धा ९ तास ७ मनिटात पूर्ण करून रॉबर्ट मित्सली पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत यावर्षी ठाण्यातील काही धावपटू सहभागी झाले होते अनेक महिने या धावपटूंनी तयारी केली होती. जगातील अगदी मोजके धावपटु या कॉम्रेड स्पर्धेसाठी पात्र होतात. या स्पर्धेच्या पात्रतेसाठी याआधी काही विशिष्ट मॅरेथॉन स्पर्धा वेळेत पूर्ण करणे हा निकष असतो. या समूहात डॉक्टर महेश बेडेकर सरस ठरले. १० तासांच्या आत ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला हे पदक दिले जाते. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सर्व स्पर्धकांसाठी १२ तासांचा अवधी दिलेला असतो आणि हा त्यांचा पहिला कॉम्रेड प्रयत्न असल्याने स्पर्धा पूर्ण करणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन डॉ बेडेकर यांनी स्पर्धा पूर्ण केली .
डोंगर टेकड्या यांच्या आडवळणांतून स्पर्धेचा मार्ग जातॊ. डॉ बेडेकर यांच्या मते आपण या निसर्गाच्या प्रेमात पडलो कि, आपोआपच मार्ग सुकर होतो. स्पर्धेदरम्यान काही किलोमीटरनंतर शारिरिक थकवा आणि वातावरणामुळे धावणे काही कठीण होते. विशेषतः ६० किलोमीटरनंतर असे क्षण आले पण ते पूर्ण करण्यात यशस्वी झालो. शेवटच्या किमीपर्यंत तिरंगा घेऊन धावणे हा एक जबरदस्त सुखावणारा अनुभव होता. भारताचा आणि आपल्या नावाचा जयघोष करणारे लोक स्पर्धकांच्या वेदना कमी करण्यास मदत करत होते. आणि म्हणूनच ही बिकट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात सहजशक्य करता आली. मी या पदकाचे श्रेय माझी सहचारिणी अपर्णा बेडेकर आणि माझ्या माझ्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित करीत आहे. मी फक्त धावलो पण सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी होते असे मी मानतो असे डॉ महेश बेडेकर म्हणाले. ते पुढे असे म्हणाले की या स्पर्धेत नाव नोंदवण्यापासून प्रत्येक वळणावर माझे कुटुंब मला सतत प्रोत्सहान देत होते. ही शर्यत म्हणजे धावण्याचा उत्सव असतो. संपूर्ण ९० किमी तुम्हाला तुमच्या नावाने आनंदित करणारे वातावरण तयार करते. ही एक सहल आहे ज्यामध्ये बार्बेक्यू आणि नृत्य होते. फिनिशिंग लाइन ओलांडणे हे कोणत्याही मॅरेथॉनरसाठी आयुष्यभर जपण्यासारखा विलक्षण अनुभव असतो . माझ्या सर्व प्रयत्नांसाठी माझा समूह मला नेहमीच प्रोत्साहन देत आहे.