‘मराठी’साठी डॉ. बेडेकर मंदिराने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:31 AM2019-06-14T00:31:58+5:302019-06-14T00:32:16+5:30
विद्यार्थी पुन्हा गिरवणार मुळाक्षरे : लिखाण - वाचनासाठी विविध उपक्रम
ठाणे : दहावी शालान्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि यात मराठी विषयाचा टक्का घसरल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होऊ लागली. इंग्रजीच्या तुलनेत मराठी या विषयाचा निकाल कमी लागला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेने मराठी हा विषय पक्का करण्यासाठी एक आगळे वेगळे पाऊल उचलले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पाचवीपासून विद्यार्थ्यांकडून पुन्हा मुळाक्षरे गिरवून घेतले जाणार आहेत. त्यांचे लिखाण, वाचन सुधरविण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
इयत्ता दहावीच्या निकालात राज्याचा इंग्रजी विषयाचा निकाल ९० टक्के तर मराठी या विषयाचा निकाल ७८.४२ टक्के लागला. इयत्ता नववीचे विद्यार्थी मराठी विषयातच जास्त प्रमाणात नापास होत असल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. बेडेकर विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी आता इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरांपासूनच शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पांचाळ यांनी मुख्याधापक पदाची सूत्रे हातात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, विद्यार्थ्यांना श आणि ष मधला फरक कळत नाही, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मराठीचे बारा महिनेही लिहीता येत नाही, मराठी या विषयाकडे त्यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता या विषयासाठी विद्यार्थ्यांवर अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. इयत्ता पाचवीच्या प्रत्येक वर्गामध्ये मुळाक्षरांचे चार्ट लावले जाणार असून त्यांना अक्षर ओळख शिकवली जाणार आहे. तसेच, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जिथून येत नाही तिथून शिकवले जाणार आहे. हल्ली मुलांना मातृभाषेतून ५० ते ६० शब्दांची कथादेखील लिहीता येत नाही, अशी चिंता पांचाळ यांनी व्यक्त केली आहे. मराठी हा विषय सुधरविण्यासाठी पाचवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या चाचणी परिक्षेबरोबर सामान्यज्ञानाची अचानक परीक्षा घेतली जाणार असून त्यांच्या इयत्तेनुसार १०० गुणांची प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे.
ही प्रश्नपत्रिका आॅब्जेक्टीव्ह स्वरुपात असेल. त्यात आधीच्या इयत्तेवर भर असेल. विद्यार्थ्यांचे वाचन सुधरविण्यासाठी आॅफ तासाला केवळ पाठ्यपुस्तकातील धड्यांचे वाचन नव्हे तर अवांतर वाचनही करून घेतले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नीट वाचन येत नाही अशा विद्यार्थ्यांची यादी त्या त्या वर्गांच्या वगर्शिक्षिकेकडून मागवली जाणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांवर जास्त मेहनत घेतली जाणार आहे. विद्यार्थी - शिक्षक - पालक यांच्यातील दुवा साधण्यासाठी ज्या पालकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड आहे त्या पालकांना एखादा तास शिकवण्यासाठी दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीन गोडी लागेल असा विश्वास पांचाळ यांनी व्यक्त केला.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा परिणाम त्यांच्या मराठी या विषयावर होत आहे. यंदा इयत्ता नववीत २६ मुले नापास झाल्याचे निदर्शनास आले, त्यांची पुनपर्रीक्षा आम्ही घेतली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे आणि त्यासाठी शालेय स्तरावर विविध प्रयत्न केले जाणार आहेत.
- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक,
डॉ. बेडेकर विद्यामंदिर