डाॅ. मेधा खोले आणि त्या अधिका-याला तत्काळ निलंबित करा, आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 09:17 PM2017-09-08T21:17:21+5:302017-09-08T21:17:39+5:30
पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाणे, दि. 8 - पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसात लोकांनी एकमेकांना हात देऊन जीव वाचविले. त्यावेळी कुठेच जात दिसली नव्हती. त्यावेळी फक्त माणुसकी ही एकच जात दिसली होती. आता या खोलेबाईने जातीपातीची मुळे किती खोलवर गेली आहेत. हे दाखवून दिले आहे. पाच वेळा केलेले जेवण आवडल्यानंतर यादव नावाच्या महिलेला नोकरीवर ठेवले होते. आता अचानक निर्मला यादव हिची जात उघडकीस आल्याने खोलेबाईचा धर्म भ्रष्ट झाला आहे. यावरून विशिष्ट लोकांच्या मनात जात किती घट्ट आहे, हे दिसत आहे. जे काल पर्यंत जात मानत नाही, असे बोलत होते. ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही. तसेच ज्या मुर्ख पोलीस अधिकार्याने हा गुन्हा दाखल केला आहे. त्याची ओळख संबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणूनच त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशा प्रकारचा जातीयवाद आता महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. आज स्वयंपाक बंदी केली आहे. उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल.; पाणी पिण्यास बंदी घातली जाईल; रस्त्यावर चालण्यास बंदी घातली जाईल. ऐन केन प्रकारे संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेकडून सुरू आहे. संविधानाने दिलेली समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा डाव आखला जात आहे. पण, संविधानाला जर हात लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.