डॉ. आंबेडकर हॉलमध्ये पीओपीचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:03 AM2019-08-06T00:03:45+5:302019-08-06T00:03:52+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेची बेफिकिरी; घटनेनंतरही झाला कार्यक्रम

Dr. Part of POP collapses in Ambedkar Hall | डॉ. आंबेडकर हॉलमध्ये पीओपीचा भाग कोसळला

डॉ. आंबेडकर हॉलमध्ये पीओपीचा भाग कोसळला

Next

डोंबिवली : पूर्वेतील केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतरही या सभागृहात एक कार्यक्रम झाला. या प्रकारामुळे केडीएमसी प्रशासनाची बेफिकिरी उघडकीस आली आहे.

डोंबिवली विभागीय कार्यालयाची वास्तू ४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे याठिकाणची कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलवण्यात येणार आहे. मात्र, या हालचालींना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या डॉ. आंबेडकर सभागृहातील पीओपीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी या सभागृहात एक कार्यक्रम होता, तोपर्यंत काहीही घडले नव्हते. परंतु, सोमवारी सकाळी जेव्हा सभागृह उघडण्यात आले, तेव्हा मात्र पीओपीचा काही भाग कोसळल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. रात्री अथवा मध्यरात्री ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या या वास्तूमध्ये अनेक ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या असून छताला असलेले प्लास्टरही पडल्याच्या घटना काही ठिकाणी यापूर्वी घडल्या आहेत. येथील पुरुष-स्त्री प्रसाधनगृह अत्यंत दयनीय अवस्थेत असून येथील गळके छत कोसळून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पीओपी कोसळल्याच्या घटनेनंतर तरी कार्यालय स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

अगोदरच बुकिंग
डॉ. आंबेडकर सभागृहात पीओपी कोसळल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतरही याठिकाणी कार्यक्रम पार पडला. सुरक्षारक्षकांनी घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतरही आयोजकांनी तेथे कार्यक्रम घेतला. यासंदर्भात सभागृहाचे व्यवस्थापन सांभाळणारे सुधाकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रमाचे बुकिंग आधीच झाल्याने कार्यक्रम करायला दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Dr. Part of POP collapses in Ambedkar Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.