डॉ. चारुदत्त शिंदे यांची पुन्हा प्रतिनियुक्तीवर ठाणे महापालिकेत नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:16 PM2021-04-28T17:16:48+5:302021-04-28T17:17:18+5:30
ठाण्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने ठाणो महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर पुन्हा डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार बुधवारी ते सेवेत रुजु झाले आहे. यापूर्वी देखील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस त्यांची अशाच प्रकारे नियुक्ती करण्यात आली होती.
ठाण्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मधल्या काळात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. राजू मुरुडकर यांना पाच लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हे पद रिक्त होते, त्याचवेळेस महापालिकेतील डॉ. वैजयंती देवगीकर यांची प्रभारी म्हणून मुख्य वैद्यकीय आरोग्य पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची सेवा वाढत असल्याने आरोग्य सेवेवर देखील ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत येथे उच्च दर्जाचा अधिकारी असावा अशी भुमिका व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार राज्य शासनाने सेंट जॉर्ज रुग्णालयातील उपअधिक्षक डॉ. चारुदत्त शिंदे यांची प्रतिनियुक्तीवर ठाणो महापालिकेत मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील या संदर्भातील आदेश काढीत शिंदे हे बुधवार पासून सेवेत रुजु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर देवगीकर यांना पुन्हा त्यांच्या मुळ पदावर आणण्यात आले आहे.
दरम्यान पहिला लाटेत देखील शिंदे यांची १० जून २०२० मध्ये आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी चांगली कामगिरी केली नसल्याचेच दिसून आले होते. तसेच फारशी छाप देखील त्यांनी सोडली नव्हती. असे असतांना पुन्हा त्यांनाच या पदावर का आणण्यात आले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.