डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:08 PM2018-10-27T16:08:31+5:302018-10-27T16:11:07+5:30
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुळ खर्चात २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांची वाढ झाली आहे.
ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मधल्या काळात थिएटरच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ते अर्ध्यावरच बंद झाले आहे. या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाण्यातील कलावतांनी या नाट्यगृहाची पाहणीसुध्दा केली होती. परंतु या नाट्यगृहाच्या कामाचा खर्च वाढत असल्याचे कारण प्रशासनाने सांगितले होते. अखेर या वाढीव कामाच्या खर्चाचा प्रस्ताव ३० आॅक्टोबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
मुख्य नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला होता. या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यानंतर या थिएटरच्या कामाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी ८० लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार मे अखेर हे थिएटर खुले होईल असा दावाही तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आतासुध्दा दिवाळीपूर्वी हे थिएटर सुरु होईल अशी शक्यता दिसत नाही. सध्या या थिएटरचे अर्धे काम झाले असून मागील महिनाभरापासून ते काम पुन्हा बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे आणि मराठी कलाकारांनी या नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दिवाळी पर्यंत हे नाट्यगृह सुरु न झाल्यास दिवाळी पहाटचा कार्यक्रम आम्ही करु असा इशाराही कलाकारांनी दिला होता.
त्यानंतर आता दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली असतांना वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार वाढीव २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांचा खर्च आता केला जाणार आहे. परंतु तरीही हे नाट्यगृह दिवाळीपूर्वी खुले होईल असे वाटत नाही.