डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:09 PM2018-10-06T17:09:21+5:302018-10-06T17:12:29+5:30
डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही.
ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता वर्ष उलटूनही हे थिएटर अद्याप नाट्यप्रेमींसाठी खुले झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी छोटेखानी शो करण्याची किंवा इतर कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांची मात्र चांगलीच कुंचबना झाली आहे. मधल्या काळात थिएटरच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ते अर्ध्यावरच बंद झाले आहे.
मुख्य नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला होता. विशेष म्हणजे मागील दिड वर्षे या नाट्यगृहाची डागडुजी सुरु असतांना पालिकेला या मिनी थिएटरची डागडुजी करता आली नाही का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आता कुठे नाटयगृह सुरु झाले असतांना पुन्हा मिनी थिएटर बंद करण्यात येत असल्याने अनेक संस्थांचा हिरमोड झाला आहे. या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यानंतर या थिएटरच्या कामाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी ८० लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार मे अखेर हे थिएटर खुले होईल असा दावाही तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला होता.
परंतु मिनी थिएटर बंद पडत असल्याने त्याचा फटका, अनेक छोटे मोठे आॅकेस्ट्रांचे कार्यक्रम, बालनाट्य महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धा आदींसह दिवाळी पहाट, आदींसह इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना बसला होता. त्यानंतर आतासुध्दा दिवाळीपूर्वी हे थिएटर सुरु होईल अशी शक्यता दिसत नाही. सध्या या थिएटरचे अर्धे काम झाले असून मागील महिनाभरापासून ते काम पुन्हा बंद झाले आहे. परंतु काम बंद का झाले, किंवा काम बंद आहे का? असा उलट सवाल पालिका प्रशासनानेच उपस्थित केला आहे. एकूणच पालिकेला याची कोणत्याही प्रकारची आस्था असल्याचे दिसत नाही.