अवधूत यरगोळे यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार
By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 9, 2023 04:53 PM2023-07-09T16:53:05+5:302023-07-09T16:53:23+5:30
अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.
ठाणे : अजेय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या झपुर्झा २०२३ या पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार अवधूत यरगोळे तर गुरुवर्य केशवराव मोरे सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार हर्ष नायर यांना प्रदान करण्यात आला. शनिवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा डॉ. बेडेकर विद्या मंदिर येथील विद्यालंकार सभागृहात पार पडला.
अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यांतर्गत रंगजेता ही स्पर्धा आयोजित घेण्यात आली होती. या स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवली येथे जून महिन्यात तर ५ जुलै रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडली. यात ३० स्पर्धक सहभागी झाले होते. नाट्याविष्कार आणि नृत्य सादरीकरणाद्वारे विविध ज्वलंत विषय त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून हाताळले. या स्पर्धेचे परिक्षण अजेय संस्थेचे डॉ. क्षितीज कुलकर्णी यांनी केले. या अंतिम फेरीतून सहा जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
झपुर्झा पुरस्कार हे संपूर्ण प्रक्रियेतील कलाकारांचे गुण, त्यांचे विचार, वागणे, अभिनयातील मेहनत, प्रतिभा, आशा अनेक पैलूंचा विचार व निरीक्षण करून दिले जातात. केलेल्या काम बघून हे पुरस्कार दिले जातात अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. शनिवारी ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर, लोकमतच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा म्हात्रे, ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एखादी कला सादर करण्यासाठी पुस्तकाचे वाचन अत्यंत आवश्यक आहे असे बोधनकर यांनी सांगितले. अजेय संस्था ही उत्तम काम करत असल्याचे कौतुकोद्गार जाधव यांनी काढले.
झपुर्झा पुरस्कार २०२३ खालीलप्रमाणे
१. नृत्यनयूर पुरस्कार : रोहन शिर्के आणि साक्षी जोगळे.
२. रंगसाधक पुरस्कार : कार्तिक हजारे, प्रसन्न माळी.
३. चेहरा पुरस्कार : श्रुतिका येसादे, हर्ष नायर.
४. पु. ल. देशपांडे स्मृती विनोदी अभिनय : समीर शिर्के, हेमांगी संभूस.
५. उत्स्फूर्तता सर्जक पुरस्कार : गौरव संभूस
६. . झपूर्झा मैत्र पुरस्कार : रोहन शिर्के.
विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र
१. हर्ष नायर.
२. अमोघ देवस्थळी.
३. कार्तिक हजारे.
४. प्रसन्न माळी.
५. श्रुतिका येसादे.
६. रोहन शिर्के.
७. हेमांगी कुळकर्णी संभूस.
८. प्रसन्न माळी.