डॉक्टरांच्या सौंदर्य स्पर्धेत ठाण्याच्या डॉ. अर्चना पवार यांना द्वितीय मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:16+5:302021-07-18T04:28:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे - गेले दीड वर्षे कोरोनाच्या काळात डाॅक्टरांना अजिबात उसंत नव्हती. आपले घर, संसार बाजूला ठेवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे - गेले दीड वर्षे कोरोनाच्या काळात डाॅक्टरांना अजिबात उसंत नव्हती. आपले घर, संसार बाजूला ठेवत बहुतांश डॉक्टरांनी अहोरात्र रुग्णांची सेवा केली. कर्तव्य बजावताना आपल्या मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्य व साैंदर्यही जपणाऱ्या महिला डॉक्टरांसाठी पुण्यात एका स्पर्धेचे आयोजन केले होते. महिला डॉक्टरांच्या कलागुणांबरोबरच त्यांचे सामाजिक कार्य व बौद्धिक क्षमतेवर आधारित ‘मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र’ या पुरस्कारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या जिल्हा दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांना द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील २३ वर्षांवरील महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. पहिल्या फेरीत महिलांनी स्वतःची ओळख सांगून नंतर रॅम्पवॉक आणि आपल्या अंगी असलेला कलागुण सादर केला. यात निवड झालेल्यांना पुढच्या फेरीत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती द्यायची होती. या सगळ्याची आणि त्यांच्या सौंदर्याची सांगड घालून निकाल जाहीर केला. यावेळी अकलूज येथील डॉ. रेवती राणे यांना ‘मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र’ हा किताब दिला. प्रथम मानांकन डॉ. रूपाली कांबळे यांना मिळाले, तर द्वितीय मानांकन ठाण्याच्या डॉ. अर्चना पवार आणि डॉ. नीशा पानसरे यांना विभागून दिले गेले. डॉ प्रेरणा बेरी-केळकर आणि डॉ. प्राजक्ता शाह यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. अभिनेते समीर धर्माधिकारी स्पर्धेचे मुख्य परीक्षक होते.