लंडन व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांचा झेंडा, कोरोनामुळे धावले शहरातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 07:21 PM2020-10-04T19:21:15+5:302020-10-04T19:28:32+5:30
कोरोनामुळे आपापल्या शहरांत धावण्याचे केले आवाहन होते.
ठाणे : जगातील सर्वात मोठ्या सहा मॅरेथॉनपैकी रविवारी पार पडलेल्या लंडनमॅरेथॉनमध्ये ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर हे दुसऱ्यांना सहभागी झाले. कोरोनामुळे यंदाची मॅरेथॉन ही व्हर्च्युअल आयोजित केली असल्याने सहभागी स्पर्धकांना आपापल्या शहरांतच धावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार डॉ. बेडेकर यांनी ठाण्यात धावून ३ तास ३३ मिनिटांच्या कालावधीत ४२.२ किमी अंतर पार केले.
जगातील न्यूयॉर्क, लंडन, शिकागो, बॉस्टर्न, टोकियो, बर्लिन या सहा देशांत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या मॅरेथॉन या ४२ किमी अंतराच्या होत असतात. गेली पाच वर्षे या मॅरेथॉनमध्ये डॉ. बेडेकर सहभागी होत आहेत. त्यातील २०१६ मध्ये बर्लिन (३ तास ५६ मिनिटे), २०१७ मध्ये न्यूयॉर्क (३ तास ३७ मिनिटे), २०१८ साली लंडन (३ तास ३२ मिनिटे), मार्च २०१९ मध्ये टोकियो (३ तास २५ मिनिटे), याच वर्षी ऑक्टोबर मध्ये शिकागो ( ३ तास १५ मिनिटे ५८ सेकंद) या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. शिकागो येथील स्पर्धेवरून त्यांची निवड जगातील सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या बॉस्टर्न मॅरेथॉनसाठी झाली आहे. कोरोनानंतर लवकरच ते बॉस्टर्न येथे होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे यंदा लंडन व्हर्च्युअल मॅरेथॉन घेण्यात आली. त्यात जगभरातील ४५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांना आपापल्या शहरांतच धावण्यास सांगितल्याने डॉ. बेडेकर यांनी ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथून लंडन येथील वेळेप्रमाणे रविवारी पहाटे साडेचार वाजता सुरुवात करून याच ठिकाणी समाप्त केली. त्यांच्यासोबत ठाण्यातील इतर गीतांजली लेनका, यशविंदर सिंग, आदित्य राठ, रवी नाडर, हंस, विजय गंभीरे हे हौशी धावपटूही सहभागी झाले होते. त्यांनी अँपद्वारे आयोजकांना वेळ पाठविली. मॅरेथॉनसाठी रस्ता हा सपाट लागतो परंतु ठाण्यातील रस्त्यांमध्ये अनेक चढ उतार असल्याने त्यामुळे अशा रस्त्यावर धावणे आव्हानात्मक होते असे डॉ. बेडेकर म्हणाले. या धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी शेकडो ठाणेकर आले होते.