वैशालीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉ. स्रेहल नरवडे निलंबित; तर कंत्राटी अधिपरिचारीका सेवेतून बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 01:16 PM2017-09-22T13:16:28+5:302017-09-22T13:17:17+5:30
उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न
राजू काळे
भार्इंदर- उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न झाल्याने त्याला कारणीभूत ठरलेल्या डॉ. स्रेहल नरवडेला यांना आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी निलंबित केले तर कंत्राटी अधिपरिचारीका पल्लवी बंदागळे यांना सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश शुक्रवारी काढला.
मालेगावला आजीकडे राहणारी वैशाली गणेशोत्सवासाठी भार्इंदर येथे राहणा-या आपल्या आई-वडीलांकडे आली होती. १२ सप्टेंबरला तीला अस्वस्थ वाटु लागल्याने ती उपचारार्थ जोशी रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता पोहोचली. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) तीच्या वैद्यकीय तपासणीनंतर तीला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील मानद सेवा देणा-यी खाजगी डॉक्टरकडून देण्यात आला. तत्पुर्वी तीची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेल्या अहवालात तीच्या लघवीतून रक्ताचा स्त्राव होत असुन रक्तबिंबीका (प्लेटलेटस्) अत्यंत कमी असल्याचे नुमद करण्यात आले होते. तो अहवाल त्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉ. नरवडे यांना तीच्या नातेवाईकांकडुन दाखविण्यात आला. हा आजार जिवितावर बेतणारा असतानाही त्यावर गांभीर्य न दाखविता डॉ. नरवडे यांनी तीला न तपासताच रुग्णालयात दाखल करुन घेतले. तीला दाखल केलेल्या महिला विभागात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारीका पल्लवी बंदागळे यांनी तीच्यावर सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार करुन डॉ. नरवडे यांना उपचारासाठी अनेकदा फोनवरुन संपर्क साधला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन सायंकाळी ५ नंतर तीची प्रकृती खालावु लागली. त्याची महिती पुन्हा पल्लवी यांनी डॉ. नरवडे यांना दिली. तरीदेखील त्यावर गांभीर्य न दाखविल्याने अखेर सायंकाळी ७ वाजता तीला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. त्यामुळे ती अनेकदा पल्लवी यांना मला मोकळ्या हवेत न्या, अशी मागणी करु लागली. त्याची माहिती पल्लवी यांनी डॉ. नरवडे यांना फोनद्वारे देऊनही त्या तीच्या तपासणीसाठी वॉर्डमध्ये गेल्या नाहीत. त्यातच रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने तीच्या उपचारात अडचण निर्माण झाली असताना तीला ती सुविधा असलेल्या रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. परंतु नरवडे यांनी त्याची दखल न घेतल्याने वैशाली अखेर बेशुद्ध पडली. त्यावेळी मात्र डॉ. नरवडे यांनी तीला तपासून त्वरीत कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तीच्या नातेवाईकांना दिला. त्याऐवजी तीला लगतच्या कस्तुरी मेडीकेअर या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीला मृत घोषित केल्यानंतर पुन्हा तीला जोशी रुग्णालयात आणण्यात आले. यामुळे बिथरलेल्या डॉ. नरवडे यांनी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निखाते यांना पाचारण केले. दरम्यान वैशालीचा मृत्यू हलजर्गीपणामुळेच झाल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केल्याने आयुक्तांनी पालिकेचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नियुक्त केली. त्यात डॉ. नरवडे व पल्लवीवर हलगर्जीचा ठपका ठेवण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी आायुक्तांना सादर केल्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी कारवाईचा आदेश काढला.