डॉ. विद्या शेट्टी यांची चौकशी, आरोग्य विभागामध्ये झाला आर्थिक गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:39 AM2019-02-22T05:39:04+5:302019-02-22T05:39:08+5:30
भिवंडी पालिका : आरोग्य विभागामध्ये झाला आर्थिक गैरव्यवहार
भिवंडी : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी सरकारकडे तक्रार करून फौजदारी कारवाईची मागणी केली होती. सरकारने दिलेल्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने मुख्य लेखापरीक्षकांमार्फत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यासह फार्मासिस्ट, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक व १५ आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी यांची चौकशी सुरू केली आहे.
शहरात १५ आरोग्य केंद्रे सुरू असून या केंद्रांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सरकारने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे. त्यापैकी २०१५-१६ पासून २०१८-१९ पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर, अनेक महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप दळवी यांनी करत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी डॉ. शेट्टी यांच्यासह चार कर्मचारी तसेच १ ते १५ नागरी आरोग्य केंद्रे व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकारने अहवाल मागवला असून याची कार्यालयीन चौकशी करत आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक कालिदास जाधव यांची नियुक्ती केली आहे. जाधव यांनी सुनावणी घेतली असता सरकारकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्त्वाची कादगपत्रे डॉ. शेट्टी यांनी सादर केली नाही. काही औषधे व कागदपत्रे आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा केला, अशी माहिती सूत्राने दिली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी डॉ. शेट्टी, फार्मासिस्ट आसीफ फारूख अन्सारी, कार्यालयीन अधीक्षक अशोक जाधव, लिपिक राजू घाडगे तसेच १५ आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व कर्मचाºयांची सुनावणी होणार आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
महापालिकेतील वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे. त्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी सुरू असून हा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
- कालिदास जाधव, मुख्य लेखापरीक्षक
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून येत्या अधिवेशनात हा विषय चर्चेला घेण्यात येणार आहे.
- महेश चौघुले, आमदार