डॉ. बाबासाहेबांचा पुतळा कधी?, रिपाइंचे उद्या उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:42 PM2017-12-03T23:42:27+5:302017-12-03T23:42:32+5:30
वारंवार मागणी आणि आंदोलन छेडूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास केडीएमसीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
डोंबिवली : वारंवार मागणी आणि आंदोलन छेडूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास केडीएमसीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्याच्या निषेधार्थ ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधत मंगळवार, ५ डिसेंबरला रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) लाक्षणिक उपोषण छेडले जाणार आहे. ठोस कृती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त पी. वेलरासू यांना पत्रही दिले आहे.
डोंबिवलीत बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी १५ ते २० वर्षांपासून होत आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या महासभेत ठराव मंजूरही झाला आहे. केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच, येथील महापालिकेच्या वास्तूचे स्थलांतर होणार असल्याने येथे पुतळा उभारण्यात येणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, रिपाइंने पुन्हा महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून मंगळवारी लाक्षणिक उपोषण छेडले जाणार आहे. पूर्णाकृती पुतळ्याचा मुद्दा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी आॅगस्टमध्ये एका पत्रकार परिषदेत दिला होता. आता बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला गेल्याने वेलरासू कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी बरीच आंदोलने झाली आहेत. परंतु, आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन गप्प बसवण्यात येते. आजपर्यंत दिशाभूल करण्यात आली आहे. आता गप्प राहणे जमणार नाही. त्यासाठी मंगळवार, ५ डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी ठोस कृती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे अंकुश गायकवाड यांनी वेलरासू यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.