तानसातील गायब हरणांचा ड्राेन कॅमेऱ्याद्वारे शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:20+5:302021-05-05T05:06:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क शेणवा : तानसा अभयारण्यात सोडण्यात आलेल्या चितळ प्रजातीच्या अचानक गायब झालेल्या २१ हरणांचा शोध घेण्यासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
शेणवा : तानसा अभयारण्यात सोडण्यात आलेल्या चितळ प्रजातीच्या अचानक गायब झालेल्या २१ हरणांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली आहे. यासाठी वनविभागाला एका खासगी कंपनीची मदत घ्यावी लागली आहे. यासाठी एक तज्ज्ञाचे पथक कार्यान्वित झाले आहे.
उरण येथील नेव्ही कॅम्पमधील बंदिस्त २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन तानसा अभयारण्यातील क्वारीचा पाडा येथे मुक्त सोडले होते. सुरुवातीला वनकर्मचारी व स्थानिक रहिवाशांना पाणथळी दिसणारा हा कळप अचानक दिसेनासा झाला. गायब झालेल्या या कळपाची माहिती वनविभागाला नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी तातडीने दखल घेऊन गायब हरणांचा शोध घेण्याचा व याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने व तानसा वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक मते यांना दिले आहेत. वनविभागाने यासाठी एका खासगी कंपनीची मदत घेतली आहे.
चार ट्रॅप कॅमेऱ्यांची मदत
तज्ज्ञ व्यक्तींचे एक पथक येथे कार्यान्वित झाले असून हे पथक तानसा अभयारण्य व परिसरातील जंगलात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाणथळ अथवा खोल दऱ्या खोऱ्यातील दाट जंगलात चित्रीकरण करून हरणांचा शोध घेत आहे. या हरणांचा शोध घेण्यासाठी चार ट्रॅप कॅमेरेदेखील बसविण्यात आले असल्याचे वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.