'10 मे पर्यंत सर्व प्रभागातील नालेसफाई पूर्ण झालीच पाहिजे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 02:41 PM2020-03-06T14:41:06+5:302020-03-06T14:42:55+5:30
पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठाणे शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाई करण्यात येते.
ठाणे - महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम राबविली जाते. मात्र गेल्यावर्षीपासून पावसाची अनियमितता लक्षात घेता यावर्षी सर्व प्रभागातील नालेसफाई ही 10 मे पर्यंत पूर्ण झालीच पाहिजे असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देत नालेसफाई मोहिमेसाठी असलेली निविदा प्रक्रिया 15 एप्रिलपर्यत पूर्ण करावी अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.
महापौर दालनात झालेल्या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रविंद्र खडताळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनेष वाघीरकर, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता रामकृष्ण कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे शंकर पाटोळे तसेच सर्व प्रभाग समित्यांचे कार्यकारी अभियंता या बैठकीस उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठाणे शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाई करण्यात येते. परंतु यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया उशीरा होत असल्याने पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाई पूर्ण होत नाही. यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पर्यायाने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यासाठी नालेसफाईसाठी सर्व प्रभागसमितीकडून नालेसफाईच्या नस्ती 15 मार्चपर्यंत घनकचराविभागाकडे सादर कराव्यात व ही सर्व प्रक्रिया 15 एप्रिलपर्यत पूर्ण करुन लगेच नालेसफाई मोहीम हाती घेण्यात यावी अशा सूचना या बैठकीत महापौरांनी दिल्या.
दरम्यान, उपायुक्त स्तरावर सर्व प्रभागसमितीत कार्यरत असलेल्या स्वच्छता निरिक्षकांची तातडीने बैठक घेवून प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील गटारांची साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत. नाल्याप्रमाणे गटारेही साफ होणे गरजेचे असून गेल्यावषी झालेल्या पावसाळ्यात शहरातील कोणत्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या मागची कारणे काय आहेत, याचा आढावा घेवून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही अशा उपाययोजना करण्यात याव्यात असेही या बैठकीत सांगण्यात आले. महापालिका प्रशासन हे नियमित काम करीत असते. परंतु एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होवून नालेसफाई न झाल्याचे आरोप देखील केले जातात, अशा तक्रारी येवू नयेत यासाठी 10 मे पर्यत सर्व प्रभागस्तरावरील नाल्यांची साफसफाई करण्यात यावी व त्या दृष्टीने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना महापौरांनी बैठकीत संबोधित केले.
वास्ताविक पाहता, वर्षातून दोन वेळा नालेसफाई होणे आवश्यक आहे, या वर्षापासून वर्षातून दोनदा नालेसफाई व्हावी या दृष्टीने नियोजन करुन सन 2020 -21 च्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवावी असे आदेशही महापौर यांनी यावेळी दिले.