गटारे अपूर्ण ; मनपा सुस्तच
By admin | Published: July 9, 2015 11:42 PM2015-07-09T23:42:30+5:302015-07-09T23:42:30+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३० कर्णिक रोड येथील घाटीबेडा मस्जीद गल्ली आणि शासकीय विश्रामगृह
अरविंद म्हात्रे चिकणघर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३० कर्णिक रोड येथील घाटीबेडा मस्जीद गल्ली आणि शासकीय विश्रामगृह व चर्चच्या मधल्या गल्लीत गटारांचे कामच झालेले नाही. तर नूतन विद्यालया समोरील गल्लीतल्या पायवाटांचे काम झाले नसल्याने तेथील वाट अद्याप मातीचीच आहे. नगरसेवकाचे आणि मनपाच्या ब प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याचे येथे दुर्लक्ष झालेले आहे.
हॉलीक्रॉस शाळेजवळील उपनिबंधक कार्यालय ते विठोबा कृपा सोसायटी, नीता अपार्टमेंटपासून ठाणगेवाडी व रामदासवाडीचा बराचसा भाग, पटवर्धन गल्ली, राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, अतुलबाग, पोलीस वसाहत, जहांगीर मैदान परिसर सिंडीकेट, मुरबाड रोड आणि रेल्वे टॅ्रकच्या मधला संपूर्ण भाग, स्टेट बँक पर्यंत व तेथून ताडीपीटा, कर्णिक रोड, नूतन शाळेचा परिसर, मनपा आयुक्त बंगला ते यशवंतराव चव्हाण मैदान परिसर, डॉ. एकलहरे गल्ली असा बराचसा भाग यात समाविष्ट आहे. ठेकेदारांच्या मनमानीमुळे कामे अर्धवट असल्याने नागरीकांना त्रास होतो आहे.
या प्रभागातून संतोषीमाता रोड आणि मुरबाड रोड हे दोन मुख्य रस्ते वर्दळीचे असून त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट झाले आहे. उरलेल्या रस्त्यांचे खोदकाम थांबल्याने कामच बंद पडले आहे. पावसाळ्यात अशीच परिस्थिती राहणार असल्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या अपूर्णतेमुळे पदपथही बाधीत झाले आहे.
या प्रभागात राणी लक्ष्मीबाई उद्यान चांगल्यापैकी विकसीत झालेले आहे. मात्र कर्णिक रोडवरील कल्पना चावला उद्यान विकासाच्या प्रतिक्षेत आहे. येथील सावंत बंगल्यासमोरच रस्त्याच्याकडेची गटारे उघडी आणि तुंबलेली आहेत. अंबरवडा समोरील चौकातील खड्डे वाहनांना अडथळे ठरत आहेत. अतुल बाग गल्लीच्या सुरुवातीलाच पायवाट उखडलेली आहे. या असुविधा मनपाचे अधिकारी आणि नगरसेवकाला दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. तो सुटेल कधी? याची चिंता स्थानिकांना आहे.