पहिल्याच पावसात नाले, सफाईची पोलखोल
By admin | Published: June 27, 2017 03:13 AM2017-06-27T03:13:46+5:302017-06-27T03:13:46+5:30
रविवारी सुटीच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसात शहरातील तब्बल ६१ ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रविवारी सुटीच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसात शहरातील तब्बल ६१ ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या नाले आणि गटारसफाईची पोलखोल झाली आहे. नालेसफाईच्या कामांसाठी १० कोटींचा निधी खर्च केला असला तरी तो ठेकेदारांना पोसण्यासाठी केला काय? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. महासभेत नालेसफाईवर लक्षवेधी मांडण्यात आली होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी ती लक्षवेधी होऊ न देता यावर विशेष महासभा घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ती होणार का? अशी विचारणा विरोधकांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या काही तासांच्या पावसात मुंब्रा आणि कळव्यातील नाले तुंबले होते. त्यानंतर शनिवारी रात्री पावसाने चांगलाच धोर धरल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. दरवर्षी प्रमाणे वंदना, आराधाना, राम मारुती रोड आदींसह शहरातील इतर महत्त्वांच्या भागात पाणी तर साचलेच. परंतु, इतर नव्या भागांमध्येदेखील यंदा पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे नाले आणि गटारसफाई झाली का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. अनेक उचांवरुन येणाऱ्या नाल्यांतून गाळ वर आल्याचे सोमवारी बहुतेक ठिकाणी दिसत होते. त्यामुळे नाल्यांची सफाई १०० टक्के झाल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला हा गाळ दिसला नाही का? असा सवाल विरोधकांनी केला आहे. त्यातही पालिकेने जीपीआरएस प्रणालीचे नियंत्रण नालेसफाईच्या कामावर ठेवले असून जीपीआरएसद्वारे जेवढी सफाई झाली तेवढीच बिले अदा करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, तेवढी तरी सफाई झाली नसल्याचा दावा करण्यात येत असून केवळ ठेकेदारांस पोसण्यासाठीच वरवरची नालेसफाई केली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
मागील मंगळवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीने नालेसफाईच्या कामाबाबत लक्षवेधी मांडली होती. परंतु, यावर सत्ताधाऱ्यांनी चर्चाच करु दिली नाही. नालेसफाईवर विशेष महासभा घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ते सत्ताधारी पाळणार का? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने या नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून आंदोलनदेखील केले होते.
शहरात १३२ किमी लांबीचे १३ मोठे व ३०० छोटे नाले आहेत. नालेसफाईची कामे विविध ६५ ठेकेदारांना दिली आहेत. या कामांसाठी सुमारे १० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई ही केवळ ३ कोटींच्या आसपास खर्च करुन केली जात होती. परंतु, मागील तीन वर्षात हा खर्च ३ कोटींवर थेट १० कोटींच्या घरात गेला कसा? असा सवाल करुन, नाल्यांची संख्या ही तेवढीच आहे. मग खर्च वाढला कसा? अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे.