गटारे - पायवाटांच्या निधीत अडकले ठाण्याचे बजेट

By Admin | Published: July 6, 2017 06:10 AM2017-07-06T06:10:17+5:302017-07-06T06:10:17+5:30

ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक २५४९.८२ कोटींचे सादर केले होते. त्यात स्थायी समितीने १०९.५० कोटींची

Drains - Thane Budget Stuck In Traffic Fund | गटारे - पायवाटांच्या निधीत अडकले ठाण्याचे बजेट

गटारे - पायवाटांच्या निधीत अडकले ठाण्याचे बजेट

googlenewsNext

अजित मांडके/ लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक २५४९.८२ कोटींचे सादर केले होते. त्यात स्थायी समितीने १०९.५० कोटींची वाढ सुचिवली होती. महासभेने पुन्हा त्यात सुमारे १०८ कोटीच्या आसपास वाढ सुचविली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी ५० लाख मिळावा, असे नमूद केले आहे. शिवाय गटार, पायवाटा आणि इतर काही निधीची तरतूदही केली आहे. त्यानुसार मागील महिन्यात गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत या अर्थसंकल्पावर चर्चा झाल्यानंतर आता ते अंतिम मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठविले आहे. परंतु, प्रभाग सुधारणा आणि गटार-पायावाटांसाठी वाढीव निधीची मागणी केल्याच्या मुद्यावरुन या अर्थसंकल्पाला प्रशासनाने अद्याप मंजुरीच दिलेली नाही. यामागे लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांत सुरु असलेल्या संघर्षाची किनार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नको तेथे निधी खर्च करण्यास अटकाव घालण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचे ठाणेकरांनी स्वागत केले आहे.
आयुक्तांनी सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पात नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नव्हती. परंतु, स्थायीने नगरसेवक निधीसाठी ३१ कोटी ६१ लाख आणि प्रभाग सुधारणानिधीसाठी ४०.५० कोटींची भरीव तरतूद केली. यामुळे प्रत्येक सदस्याला नगरसेवक निधी म्हणून २३ लाख ४१ हजार आणि प्रभाग सुधारणा निधी म्हणून ३० लाख उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार, सुधारीत २६५९.३२ कोटींचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला होता. त्यात गटार बांधण्यासाठी आणि पायवाटांसाठीदेखील ५ कोटींची विशेष तरतूद केली होती.महासभेतही यावर तीन दिवस चर्चा सुरु होती.
दरम्यान मागील महिन्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत यावर अंतिम मोहर उमटवून स्थायी समितीने प्रस्तावित केलेल्या प्रभाग सुधारणा निधीची रक्कम ३० लाखांवरुन ५० लाख प्रस्तावित केली. तसेच गटार, पायवाटा आदींसाठीदेखील निधी प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे मूळ अंदाजपत्रात यापैकी एकाही बाबीसाठी तरतूद नव्हती. परंतु, स्थायी पाठोपाठ, महासभेने आणि गटनेत्यांनीदेखील त्यात भरीव तरतूद प्रस्तावित केल्याने स्थायी समितीने सुचविलेल्या अंदाजपत्रकात सुमारे १०८ कोटींची वाढ झाली आहे.
आता हे सुधारीत अंदाजपत्रक पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. परंतु आयुक्तांनी ज्यासाठी निधीच प्रस्तावित केला नव्हता, त्याच बाबींसाठी लोकप्रतिनिधींनी तो प्रस्तावित केल्याच्या मुद्यावरुन अर्थसंकल्प आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

महिनाभर वाटाघाटी; तोडगा मात्र नाही

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गटार पायवाटा या छोट्या कामांसाठी मागील कित्येक वर्षे कोट्यवधींचा चुराडा झाला आहे. पाच वर्षात किमान दोन वेळा गटार, पायवाटा दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे हा निधी तसाही वायाच जात आहे. त्याऐवजी हा निधी इतर कामांसाठी वर्ग केल्यास त्याचा विनियोग होऊ शकतो. यामुळेच यासाठी प्रस्तावित केलेल्या निधीला मंजुरी मिळणार का? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह असून यावरुन मागील महिनाभर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी सुरु आहेत. परंतु,यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

Web Title: Drains - Thane Budget Stuck In Traffic Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.