नाले तुंबलेले, पालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:41 AM2019-06-12T00:41:53+5:302019-06-12T00:42:21+5:30
नाले तुंबलेले : पहिल्याच पावसात पोलखोल
उल्हासनगर : पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मंगळवारी आरोग्य विभागाची झाडाझडती घेत स्वच्छतेचे आदेश दिले. नाले तुंबलेले असून वालधुनी नदीसह इतर नाल्याच्या स्वच्छतेची मागणी स्थानिक नगरसेवक गजानन शेळके यांनी केली आहे.
उल्हासनगरात पहिल्याच पावसाने नालेसफाईचा पोलखोल केला. वालधुनी नदीत वाहून आलेला गाळ व केरकचरा वडोलगाव पुलाखाली अडकल्याने पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती शेळके यांनी व्यक्त केली. तीच परिस्थिती इतर मोठया नाल्यांची झाली असून नाल्याची वरवरची सफाई झाल्याचा आरोप करण्यात आला.
आयुक्त देशमुख यांनी दुपारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाची झाडाझडती घेतली. बैठकीला मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व मुकादम उपस्थित होते. शहरातील मोठया नाल्यांची साफसफाई ८० टक्क्या पेक्षा जास्त झाली, अशी माहिती केणे यांनी दिली. प्रत्यक्षात पाहिल्या पावसात नाले तुंबलेले होते. वडोलगाव पुलाखाली कच-याचा ढीग साचला असून मातीच्या गाळाने नागरिकांना येण्या-जाण्यास अडथळा होत असल्याचे शेळके यांनी सांगितले. लहान नाल्यांच्या सफाईसाठी ३०० कामगार कंत्राटदाराने लावले आहेत. पालिका आयुक्तांनी स्वत: साफसफाईची पाहणी केल्यास, खरा प्रकार उघड होईल असे राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी सांगितले.
पुन्हा सफाई व्हावी
खेमानी नाला, वालधुनी नदी, गायकवाड पाडयाचा नाला, समतानगर नाला, सम्राट अशोकनगरचा नाला, महादेवनगरचा नाला, ज्योती कॉलनी नाला, करोतियानगर नाल्यासह गुलशननगर नाल्याची पुन्हा साफसफाई होण्याची मागणी केली जात आहे. मोठया नाल्यांची सफाई न झाल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.