ठाण्यात ३ डिसेंबरला नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा प्रयोग, रसिकांना नि:शुल्क प्रवेश
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 27, 2022 04:56 PM2022-11-27T16:56:58+5:302022-11-27T17:08:18+5:30
ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.
ठाणे : सुप्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे “नरहर कुरुंदकर – एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण होणार आहे. कुरुंदकर प्रतिष्ठान निर्मित साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे ठाणे आर्ट गिल्ड, अ. भा. मराठी नाट्य परिषदेची ठाणे शाखा आणि कलासरगम यांनी शनिवार ३ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये आयोजन केले आहे.
मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर या नाटकाचे पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, लातूर, अंबाजोगाई, सेलू, परभणी, हैदराबाद, वरोरा, नागपूर, वर्धा, जळगाव, नाशिकनंतर आता ठाणे येथे प्रयोग होत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, विश्वास अंबेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा यात सहभाग आहे.
नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्य लढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून नरहर कुरुंदकर यांनी अवघे विचारविश्व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. विद्यार्थी घडविणे आणि मराठवाड्यातल्या व्यक्ती आणि संस्था यांना प्रोत्साहन देण्याची मोठी कामगिरी त्यांनी त्यावेळी केली. या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे.
बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात. या या प्रयोगाला प्रवेश नि:शुल्क असून प्रवेशिका नाट्यगृहावर एक तास आगोदर उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ९८२०४०४८८८ या क्रमांकावर दीपक सावंत यांच्याशी किंवा ७७१५९९२९१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.