कोसळलेल्या भिंतीसोबत स्वप्नेही भंगली

By admin | Published: November 20, 2015 02:07 AM2015-11-20T02:07:45+5:302015-11-20T02:07:45+5:30

वीणा गनिगा या पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणीने कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घराला हातभार लागावा याकरिता दोन दिवसांपूर्वी एका खासगी कोचिंग क्लासमध्ये

Dream collapsed with a broken wall | कोसळलेल्या भिंतीसोबत स्वप्नेही भंगली

कोसळलेल्या भिंतीसोबत स्वप्नेही भंगली

Next

- प्रशांत माने, कल्याण

वीणा गनिगा या पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणीने कुटुंबाच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घराला हातभार लागावा याकरिता दोन दिवसांपूर्वी एका खासगी कोचिंग क्लासमध्ये नोकरी पत्करली होती. गुरुवारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी अंत झाल्याने गनिगा कुटुंबाचा आधार निखळून पडला आहे.
वीणा ही अन्य तरुणींप्रमाणे भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून होती. घरच्या आर्थिक परिस्थितीची तिला पूर्ण कल्पना असल्याने तिने कुटुंबाला हातभार लावण्याकरिता नोकरी पत्करली होती. दुचाकीवरून सह्याद्रीनगर परिसरातून गुरुवारी सकाळी जात असताना त्रिवेणी लोरा इमारतीची संरक्षक भिंत तिच्यावर कोसळली आणि त्याखाली दबून तिचा करुण अंत झाला.
कल्याण आरटीओ नजीकच्या सहयाद्रीनगर मधील एका बैठया चाळीत वीणा आपल्या आई, वडील आणि लहान भावासह राहायची. कल्याण पश्चिमेकडील मोहिंदर सिंग काबल सिंग महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली होती. वीणा ही मनमिळावू आणि आपल्या स्वभावामुळे माणसं जोडणारी होती. वीणाचा अशा विचित्र अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच ती राहत असलेल्या चाळीवर, आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली होती.
कल्याण-डोंबिवली परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जेवढा महत्वाचा आहे तेवढाच येथील बांधकामाच्या दर्जाचा प्रश्नही महत्वाचा आहे. रस्त्याने जात असताना इमारतीच्या भिंती कोसळून जर अपघात होणार असतील तर आम्ही आणि आमच्या घरातल्या मुलाबाळांनी घराबाहेर पडायचे कसे, असा संतप्त सवाल या परिसरात राहणाऱ्यांनी केला.
अपघात घडून दोन तासाचा कालावधी उलटूनही अग्निशमन दल अथवा पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते, असा आरोप रहिवाशांनी केला. वीणाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता गेलेले केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या कानावरही लोकांनी हा प्रकार घातला. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी महापौरांनी उपस्थितांना दिले.

शाळा बंद होती म्हणून...
याच परिसरातील शाळा दिवाळीची सुट्टी असल्याने बंद होती. ती मुले याच भिंतीच्या अवतीभवती खेळ असतात. ती जर आज येथे असती तर केवढा मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती एका प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली. मृत्यू कुणावर, कसा व कधी झडप घालील ते सांगता येत नाही परंतु वीणाच्या मृत्यूने एका कुटुंबाची स्वप्ने आणि उमेद त्या कोसळलेल्या भिंतीखाली दबून गेली आहे...

Web Title: Dream collapsed with a broken wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.