जिल्ह्यातील नऊ हजार ३७६ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:56+5:302021-08-17T04:46:56+5:30
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, संस्था आणि व्यक्तींनी ‘महाआवास अभियान’ काळात नऊ हजार ...
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, संस्था आणि व्यक्तींनी ‘महाआवास अभियान’ काळात नऊ हजार ३७६ कुटुंबीयांच्या घराचे स्वप्न साकार केले आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन संस्था आणि व्यक्तींना स्वातंत्र्य दिनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे हा कार्यक्रम रविवारी पार पडला. सर्वांसाठी घरे २०२२ हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण आहे. राज्य शासनानेदेखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरिता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करून गुणवत्तावाढीसाठी जित्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ जून या कालावधीत महाआवास अभियान- ग्रामीण राबविण्यात आले. या अभियान कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना महाआवास अभियान पुरस्कार आणि महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, पोलीस आयुक्त जय जीत सिंह, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, आदी उपस्थित होते.
.