व्हिसलिंग इन्स्टिट्युशन सुरू करण्याचे स्वप्न - निखिल राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:46 AM2018-05-28T06:46:55+5:302018-05-28T06:46:55+5:30
आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धेत भारताला प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या मुंबईच्या निखिल राणे याने नुकतीच ठाण्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने हिंदी-मराठी आणि क्लासिकल गाण्यांवर शिळवादन करून शिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ठाणे : आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धेत भारताला प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या मुंबईच्या निखिल राणे याने नुकतीच ठाण्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने हिंदी-मराठी आणि क्लासिकल गाण्यांवर शिळवादन करून शिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, भविष्यात व्हिसलिंग इन्स्टिट्युशन सुरू करून येणाºया पिढीला शिळवादन या क्षेत्रात आणण्याचा मानस व्यक्त केला. प्रत्येकाकडे गाणे नसते, पण शिटी नक्की असते, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
एका खाजगी इव्हेंट्स संस्थेने निखिलची सदिच्छा भेट आयोजित केली होती. यानिमित्ताने ठाणेकरांना निखिलशी संवाद साधण्याची संधी मिळाली. १९७२ सालापासून आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धा विविध देशांत आयोजित केली जाते. तब्बल ४६ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये प्रथमच भारत या स्पर्धेत उतरला आणि यात निखिलने भारताचे प्रतिनिधित्व केले. जपान व्हिसलिंग असोसिएशनच्या वतीने जपान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात आठ देशांतील ५० स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला होता. हिकीफुकी, अलाइड आटर््स, रेकॉर्डेड अकंपनीमेंट अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा घेतली जाते. हिकीफुकी या प्रकारात निखिलने प्रथम क्रमांक पटकावला. २०१८ मध्ये ३ मे रोजी सुरू झालेली ही स्पर्धा ५ मे रोजी संपली. या स्पर्धेत ११ देशांचे ६७ स्पर्धक सहभागी झाले होते. निखिलने ‘मेहबुबा मेहबुबा’ आणि ‘वेस्टर्न क्लासिकल’ गाणं वाजवून पुन्हा एकदा त्याच प्रकारात पहिला क्रमांक पटकावला.
यंदाचे या स्पर्धेचे ४८ वे वर्ष होते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धा जिंकल्यानंतर प्रथमच निखिल ठाण्यात आला. ठाणेकरांशी त्याचा संवाद व्हावा, या क्षेत्रात येणाºयांना प्रोत्साहन मिळावे, असा या भेटीमागचा उद्देश असल्याचे हर्षद समर्थ यांनी लोकमतला सांगितले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी शिटी वाजवतो. पाच वर्षे हिंदुस्थान क्लासिकलचे धडे घेतले आहेत. माझ्या गळ्यात इन्स्ट्रूमेंट आहे, तर त्याचा वापर करून मी शिटीवादनाला विकसित केले.
सकारात्मक दृष्टिकोन हवा
व्यायाम, प्राणायाम, मस्तिकासन करून ब्रह्मविद्यादेखील शिकलो. सकारात्मक दृष्टिकोनातून शिटीकडे पाहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.