लॉकडाऊनमध्ये वंचित मुलांनी रेखाटली स्वप्ने; विविध वयोगटांतील ७२ जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:26 AM2020-07-20T00:26:11+5:302020-07-20T00:26:27+5:30
सुप्रिया विनोद म्हणाल्या की, माझ्या बाबांना परिस्थितीसमोर हरणे माहीत नव्हते.
ठाणे : लॉकडाऊनच्या काळातही मर्यादित साधने आणि बिकट आर्थिक परिस्थितीत आपले आयुष्य जगणाऱ्या वंचित मुलांनी जणू आपली स्वप्नेच चित्रातून रेखाटली. ‘मतकरी स्मृतिमाला’ उपक्रमाच्या प्रथम पुष्पात वस्तीतील मुलांनी भविष्यातील माझी वस्ती, निसर्ग व तंत्रज्ञान यापैकी विषयावर चित्रे काढली. विविध लोकवस्तीतील वेगवेगळ्या वयोगटातील ७२ मुलामुलींनी यात सहभाग घेतला.
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार सुप्रिया विनोद आणि जगप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांनी सिद्धू वाघमारे, आयुषी घाणेकर, प्रतिमा भागवणे, सई मोहिते, दीपेश दळवी आदी ११ विद्यार्थ्यांची वेधक आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रे निवडून त्या मुलांशी कार्यक्रमात संवाद साधला. बोधनकर म्हणाले की, या चित्रांतून मुलांचा डोळसपणा आणि त्यांच्या विचारांची व कल्पनांची व्याप्ती किती मोठी असते हे दिसते.
सुप्रिया विनोद म्हणाल्या की, माझ्या बाबांना परिस्थितीसमोर हरणे माहीत नव्हते. हाच गुण वंचितांच्या रंगमंचातील मुलांमध्ये रुजवण्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे, हे आज या मुलांनी कठीण परिस्थितीतही दाखवलेल्या उत्साहाने सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार आणि रायगड अॅक्टिविस्टचे क्युरेटर राजू सुतार यांनी मतकरी यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलनावर’ काढलेली चित्रे दाखवून त्यातून सूचित होणाºया अर्थावर विवेचन केलं. ते म्हणाले की, ’अॅक्टिविस्ट आणि आर्टिस्ट याचं सुरेख मिश्रण मतकरींच्या या चित्रात आहे. त्यांची चित्रे एका हेतूने काढलेली आहेत आणि तो हेतू या चित्रांतून स्पष्ट समजतो आहे. ही चित्रे म्हणजे त्यांनी या आंदोलनावर केलेले अतिशय प्रभावी भाष्य आहे.
या कार्यक्रमाच्या तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाºया प्रकेत ठाकूर यांनी काढलेली मतकरी यांची अप्रतिम डिजिटल चित्रे यावेळी सर्वांची प्रशंसा मिळवून गेली. यावेळी, प्रकाश आंबेगावकर, सुनंदा परब, सौरभ करंदीकर, समीर परांजपे, मकरंद तोरसकर, विजू माने, प्रकेत ठाकूर, नीलिमा कढे, सुरेन्द्र दिघे असे अनेक चित्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मतकरींना मानवंदना द्यायला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘नाट्यजल्लोष’च्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन मीनल उत्तुरकर यांनीकेले.