गटाराच्या सांडपाण्यात बसून विद्यार्थी घेतात शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:24 AM2017-07-28T00:24:44+5:302017-07-28T00:24:47+5:30
पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे.
कल्याण : पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या शाहीन जव्वाद डोण यांनी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. विरोधी पक्षाला सत्ताधाºयांकडून पक्षपाती वागणूक मिळत आहे. प्रशासनाने राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
रेतीबंदर परिसरातील मोहम्मदीया, नॅशनल, अल्फा आणि आसरा या चार खाजगी उर्दू शाळा आहेत. मोहम्मदीया शाळेत ७०० विद्यार्थी, उर्दू नॅशनल स्कूलमध्ये २ हजार आाणि आसरा शाळेत ६००, तर अल्फा शाळेतून ३०० विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये पावसाचे पाणी साचते. शाळांच्या परिसरातून वाहणारी गटारे तुटुंब भरतात. त्यातील पाण्याचा न होणारा निचरा तसेच तेथील गटार फुटल्याने सांडपाणी थेट शाळेतील वर्गात शिरते.
परिणामी, विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही शाळांमध्ये बसायला बाक आहेत. मात्र, साचलेल्या पाण्यात पाय भिजल्याने पायाला चिखल्या होऊन खाज सुटत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
या प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शाहीन डोण या महापालिकेत गटनेत्या आहेत. शाळेत पावसाचे पाणी साचल्यावर ते काढण्यासाठी सफाई कर्मचाºयांना बोलवल्यास ते येत नाहीत. काही सफाई कर्मचारी त्यांच्या बदल्यात सफाई कर्मचारी नेमत असल्याने सफाई कामगारांकडून हप्तेबाजी केली जाते.
त्यात प्रशासनही लिप्त आहे. एक गोल्डन कर्मचारी बिल्डर असल्याची बाब नुकतीच महासभेत उपस्थित झाली होती. त्याला दुजोरा देणारा शाहीन यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे सफाई कामगारांनी त्यांच्या तक्रारीकडे पाठ दाखवली आहे.