नळाचे नको, बिसलरीचे पाणी प्या; पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अजब सल्ला
By अजित मांडके | Published: August 16, 2023 07:29 PM2023-08-16T19:29:19+5:302023-08-16T19:30:00+5:30
दुषित पाण्यामुळे मध्यवर्ती भागातील रहिवाशी हैराण
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा घाणेरडा वास येत आहे. तसेच पाण्याचा रंग पिवळसर झाला असून पाणी बेचव झाले आहे. त्यामुळे शहरातील बरेच नागरिक आजारी पडले असून त्यांना पोट दुखणे, ताप येणे, उलट्या होणे, अतिसार असे गंभीर आजार जडू लागले आहेत. मागील आठ दिवसापासून पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी या भागात दुषीत पाणी कशामुळे येत आहे, कुठे लिकेज आहे, याचा शोध घेत आहेत. परंतु अद्यापही त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे उथळसर, कॅसलमिल सर्कल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड व कोर्ट नाका परिसर, पोलीस लाईन या भागातील नागरीकांना पालिकेने अजब सल्ला दिला आहे. ज्यात नळाचे नको तर बिसरलीचे पाणी प्या असे सांगितले आहे.
मागील आठ दिवसापासून ठाण्यातील मध्यवर्ती भाग म्हणजेच उथळसर, कॅसलमील, गोकुळ नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कोर्ट नाका, पोलीस लाईन परिसरत आदी भागांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसत आहे. परंतु जे पाणी येत आहे, त्याला अतिशय घाण दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पाणी पिणे तर सोडाच इतर कामासाठी देखील ते वापरात येत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणने आहे. या संदर्भात येथील रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यानंतर मागील आठ दिवसापासून पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी खोदकाम करीत आहेत. परंतु लिकेज किंवा कोणत्या ठिकाणापासून दुषित पाणी पुरवठा पुढे जात आहे, याचा शोध अद्यापही लागू शकलेला नाही. परंतु ड्रेनेज लाईनमुळे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे जो पर्यंत लिकेज सापडत नाही, तो पर्यंत नळाचे पाणी न पिता बिसलरीचे पाणी प्या असा अजब सल्ला येथील रहिवाशांना देण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वीच उथळसर नाका येथील कॅसल मिल सर्कल पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर मधोमध ड्रेनेज लाईन असुन या लाईन मध्ये दुतर्फा अस्तित्वातील सोसायटी, रहिवाशी इमारती असून या इमारतींच्या ड्रेनेजचा प्रवाह सुरळीत होत होता. परंतू रस्ता काँक्रीटीकरण कामात बहुतांश ड्रेनेज लाईन चेंबरमध्ये सिमेंट पडल्याने चेबंरमधील नाली चोक अप झालेल्या आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाºयांकडून अथक परिश्रम करूनही ड्रेनेज लाईन मधील सिमेंट काँक्रीटचे थर साचल्याने क्लिअर करणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे.
रस्ता कंत्राटदाराने ड्रेनेज लाईन चेंबर बांधकाम अर्धवट केले असुन केवळ विटांचे बांधकाम केले आहे. त्यावर प्लास्टर करणे अपेक्षित होते. परंतू महापालिका संबंधित अधिकाºयांच्या कामचुकार आणि दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीने या चेंबरचे बांधकाम निकृष्ट दजार्चे केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यातूनच स्वागत हॉटेल समोर चौकात चेंबरही ढासळले आहे. त्यामुळे संपूर्ण लाईन चोक अप झाली आहे. तर डेल्टा अव्हेन्यू समोर एक दोन चेंबर चे झाकण देखील काँक्रीटीकरणात गेल्याने ते ओपन करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
एकूणच यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उथळसर नाका ते कॅसल मिल सर्कल पर्यंतची सर्व ड्रेनेज लाईन चेंबरचे बांधकाम प्लायस्ट करावे, सिमेंट काँक्रीटीकरण स्लॅब मध्ये अडकलेले चेंबर खुले करावे. अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.