कल्याणच्या सखल भागांत साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:03 AM2019-08-04T00:03:19+5:302019-08-04T00:03:33+5:30
नागरिकांमध्ये धास्ती कायम; खाडीलगत भरतीमुळे वाढली पाण्याची पातळी
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात २६ आणि २७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून नागरिक सावरत असतानाच पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी धुवाधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी पुन्हा पावसाची धास्ती घेतली. पावसाचे पाणी सकाळी ठिकठिकाणी शिरले होते. तसेच खाडीलगतच्या भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
पावसाने शुक्रवार रात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते तीनच्या रूळांमध्ये पाणी साचले. परिणामी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, आंबेडकर रोडवर पाणी साचले होते. पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना रस्ता ओलांडता येत नव्हता. वालधुनी व उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पावसाचे पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी भरतीच्या वेळी खाडीनजीक पावसाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. पुन्हा घरे पाण्याखाली जाणार का, या चिंतेने ते त्रस्त होते. बिर्ला महाविद्यालय परिसरात चाळींमध्ये पाणी शिरले. रहिवाशांनी पाण्याच्या पंप लावून घरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऐतिहासिक काळा तलावही भरून वाहत होता. अनुपनगर, घोलपनगरात पाणी साचले. केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागातील शामा व जीवनछाया या चाळीत पाणी साचले. शिवाजीनगर, वालधुनी परिसर, दावडी, पिसवली परिसरातीही पाणी शिरले.
महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि उपायुक्त मारुती खोडके यांनी जलमय झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच काही नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिका हद्दीत सकाळपर्यंत १५० मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण नोंद दोन हजार ४५४ मिमी इतकी झाली आहे.
कांबा येथील नाला केला अरुंद
टिटवाळा : पावसाळ्यात कल्याण-मुरबाड महामार्ग बंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा पॉवर हाउस कंपनीसमोरील सपना लॉन्स येथील अरुंद नाल्यावर अखेर कांबा ग्रामपंचायतीने शनिवारी कारवाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर झाला.
कांबा गावातून कल्याण-मुरबाड महामार्ग जातो. या मार्गावर पूर्वीपासून म्हारळ व कांबा टाटा पॉवर हाउस येथे पावसाळ्यात पाणी भरत होते. परंतु, एमएमआरडीएने शहाड ते म्हारळपाडादरम्यान काँक्रिटचा रस्ता बनवून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु, तरीही टाटा पॉवर हाउस येथे पाणी भरत असल्याने हा मार्ग बंद होत आहे. २७ जुलैच्या पावसातही हा रस्ता बंद झाला. शनिवारीही तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अखेर कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश बनकरी, उपसरपंच संपदा बंडू पावशे, सदस्य मदन उबाळे, ग्रामविकास अधिकारी ए.जे. इंगोले, कर्मचारी गुरु नाथ बनकरी आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींच्या उपस्थितीत हा नाला जेसीबीद्वारे रुंद केला.