दिवा स्थानकात विकासकामांसाठी पिण्याचे पाणी; टँकरलॉबीवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:27 AM2019-04-18T06:27:33+5:302019-04-18T06:27:36+5:30
दिव्यात टँकरलॉबीमुळे कृत्रिम पाणीटंचाई वर्षाचे बाराही महिने कायम पाहायला मिळते आहे.
ठाणे : दिव्यात टँकरलॉबीमुळे कृत्रिम पाणीटंचाई वर्षाचे बाराही महिने कायम पाहायला मिळते आहे. त्यातच, या लॉबीने आता दिव्यातील रेल्वेकामांचा ठेका मिळालेल्या ठेकेदारालाही ग्राहक बनवले आहे. त्यामुळे दिवा रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
दिवा स्थानकात पादचारी पुलासह फलाट तसेच इतरही कामे सुरू आहेत. रेल्वेलाइनवर उभारण्यात येणारे खांब यासाठी सिमेंट, खडी व रेतीच्या मिश्रणासाठी पाण्याची गरज लागत आहे. त्यासाठी ठेकेदार हे या टँकरलॉबीकडून पिण्याचे पाणी विकत घेताना दिसत आहे. टँकरधारक दिवसाढवळ्या मशीनद्वारे फलाटांवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या भरताना दिसत आहेत. यामध्ये २००० लीटरच्या फलाट क्रमांक-५-६ वर तीन टाक्यांसह काही ड्रम ठेवण्यात आले आहेत. तसेच नव्या रेल्वेलाइनच्या ठिकाणी ठेकेदाराद्वारे पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये पाणी साठवले जात आहे. हेच पाणी रेल्वेकामांसह रेल्वेचे काम करण्यासाठी आणलेले मजूर पाणी पिण्यासोबत इतर कामांसाठी वापरत असल्याचे दिसते.
रेल्वेकामाचा ठेका दिल्यावर ठेकेदाराला रेल्वे विकत वीजपुरवठा करते. पाणी किंवा कोणतीही मदत किंवा सुविधा पुरवत नाही. रेल्वेकामांसाठी लागणाऱ्या पाण्याबाबत विचारल्यास तो ठेकेदार कुठून पाणी आणून वापरतो, हे सांगता येत नाही. - शंकर नारायण, प्रबंधक, दिवा रेल्वेस्थानक