महापालिकेच्या रुग्णालयात वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हलगर्जीपणाने घेतला बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:43 PM2021-05-18T19:43:00+5:302021-05-18T19:45:14+5:30
Miraroad News : मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे.
मीरारोड - मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पत्राच्या खोलीत विजेचा प्रवाह वाहत असल्याची कल्पना नसल्याने दाराशी हात लावलेल्या शववाहिनीच्या चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा विजेचा धक्का लागण्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप होत आहे. मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे.
सदर रुग्णालयात प्रभाग समिती कार्यालय आदी सुरू केले असून इमारतीवर मजले वाढवण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी रुग्णालयात असलेली वाहन चालकांसाठीची पक्की खोली पालिकेच्या बांधकाम विभागाने चक्क ठेकेदारास सिमेंट आदी सामान ठेवायला दिली आहे. तर वाहन चालकांना पत्र्याची खोली बांधून देण्यात आली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने पत्र्याच्या खोलीत व बाहेर पाणी साचले होते. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास शववाहिनीचे चालक धर्मलिंगम गोविंदन मुत्तू ( ६० ) रा. डॉ. आंबेडकर नगर, भाईंदर पश्चिम हे कामाची पाळी संपल्याने पत्र्याच्या खोलीत नोंदवही वर नोंद करून घरी जायला निघत होते. तर रात्रपाळी असल्याने राजेंद्र खेडेकर हे पालिका रुग्णवाहिकेची कर्मचारी आत येऊन बसले होते.
त्याचवेळी पत्र्याचे दार आणि पाण्याशी स्पर्श होताच धर्मलिंगम यांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते खालीच कोसळले. खेडेकर हे प्लास्टिक खुर्चीवरून पाय खाली ठेवत नाही तोच त्यांना सुद्धा विजेचा धक्का बसून ते सुद्धा खाली पडले. त्यांनी सुरक्षा रक्षकास कळवले असता वॉर्डबॉय धावून येताच त्याला सुद्धा विजेचा शॉक लागला. त्यानंतर मुख्य स्विच बंद केला. परंतु तो पर्यंत धर्मलिंगम यांचा मृत्यू झाला होता. खेडेकर याना भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. धर्मलिंगम हे पालिकेच्या सेवेत होते.
महापालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणाचा बळी
इमारतीचे मजले वाढवण्याच्या कामासाठी वाहन चालकांची पक्की खोली ठेकेदारास सिमेंट ठेवण्यासाठी देऊन वाहन चालकांना मात्र पत्र्याची असुरक्षित खोली बांधून देण्याच्या पालिका - नगरसेवकांच्या ठेकेदार धार्जिण्या प्रकारामुळे हा बळी गेल्याचा संताप श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी केला आहे. पत्र्याची खोली पाऊस पाण्यात पाणी भरून धोक्याची ठरत असताना देखील विजेच्या वायर आणि वीज उपकरणांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे महापालिका आणि नगरसेवकांना वाटले नाही असे पटेल म्हणाले.