मद्य प्राशन केल्याच्या संशयातून ठाण्यात टीएमटी बसच्या चालकाला रिक्षाचालकांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:28 PM2018-01-21T21:28:49+5:302018-01-21T21:37:51+5:30
किरकोळ अपघातानंतर मद्य प्राशन केल्याच्या संशयातून टीएमटीच्या चालकाला काही रिक्षा चालकांनी माजीवडा नाका येथे बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने टीएमटी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ठाणे : मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे (३५) या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) चालकाला काही रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजीवडा नाका येथे घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या चालकाने मद्य प्राशन करून बस चलविल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला होता. त्याच्या बसने एका उभ्या असलेल्या कारला गोल्डन डाइज नाका येथे धडक दिली. तेव्हा काही रिक्षाचालकांच्या आग्रहाने कारचे काय नुकसान झाले, हे पाहण्यासाठी गाडे खाली उतरले. तेव्हा त्यांना वाहतूक पोलिस चौकीत येण्यास एका टोळक्याने भाग पाडले. चौकीत नेत असतानाच रिक्षाचालकांच्या एका टोळक्याने त्यांना जबर मारहाण केली. कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीमध्ये श्वास विश्लेषक यंत्राद्वारे त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांनी मद्य प्राशन केले नसल्याचे आढळले. या तपासणीत सत्य बाहेर आल्यानंतर त्याला मारहाण करणाºयांनी मात्र तिथून पळ काढला.
......................
काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांकडून तरुणीचा चालत्या रिक्षातच विनयभंग केल्याच्या दोन घटना कापूरबावडी परिसरातच घडल्या होत्या. प्रवासी नाकारणे, जादा भाडे घेणे हे तर नित्याचेच आहे. त्यातच टीएमटीचालकालाही त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेने टीएमटी चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
......................
प्रवाशी घेण्याच्या आकसातून मारहाण
भिवंडीकडे जाणा-या रस्त्यावर माजीवडा नाका (गोल्डन डाईज नाका) येथे टीएमटीच्या थांब्यावरूनच काही रिक्षाचालक प्रवासी घेतात. त्यांना टीएमटी बसचा अडथळा वाटतो. याच आकसातून त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे शंकर गाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘क्षुल्लक कारणावरून टीएमटी बसचालकाला मारहाण करणे चुकीचे आहे. त्यातच या चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे पोलिसांच्याच तपासणीत आढळले. त्यामुळे त्याला मारहाण करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे.’
-अनिल भोर, सभापती, ठाणे परिवहन सेवा,ठाणे