वरसावे पुलाच्या वाहतूककोंडीचा चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:52 PM2018-12-09T23:52:21+5:302018-12-09T23:52:49+5:30
कृत्रिम पाणीटंचाई : पाण्याचे टँकरही झाले मिळेनासे, दोनपैकी एकच मार्गिका सुरू
- राजू काळे
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पुलावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुलाच्या वसई-विरार क्षेत्रातील बाजुकडे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागल्याने स्थानिक चाकरमानी, विद्यार्थ्यांना विलंबाचा फटका बसू लागला आहे. अशातच पाण्याचे टँकरही मिळेनासे झाल्याने परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) २००२ मध्ये वरसावे येथील घोडबंदर नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन स्प्रींग बदलण्यासाठी ७ डिसेंबरपासून पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. या पुलावरील दोनपैकी एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवली आहे. त्याच्यालगत असलेल्या जुन्या पुलावरील मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू ठेवल्याने मीरा-भाईंदर क्षेत्रातील वरसावे वाहतूक बेटावर वाहतूक कोंडीचा त्रास तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याउलट पूलाच्या दुसऱ्या टोकावर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाल्याने ती सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालजीपाड्यापर्यंत वाढली आहे. याचा जास्त फटका तेथील स्थानिकांना बसू लागला आहे. येथील चाकरमान्यांना मीरा-भाईंदरसह ठाणे व मुंबई येथे नोकरीसाठी जावे लागते. विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर क्षेत्रातील शाळांमध्ये यावे लागते. येथील लोकांना मीरा-भार्इंदर शहर सोईचे ठरते. त्यामुळे येथील विद्यार्थी मीरा-भाईंदरमधील शाळा व महाविद्यालयांत शिकण्यासाठी येतात. येथील अनेक कुटुंबांना पाण्यासाठी नळजोडणी नसल्याने त्यांना वसई-विरार क्षेत्रातील मालजीपाडा तर मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरातून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. मालजीपाडा येथून टँकर पोहोचण्यास किमान ४ ते ५ तास लागत असल्याने पूर्वी येणारे टँकर वाहतूककोंडीमुळे येईनासे झाले आहेत. काशिमीरा येथून येणाºया टँकरला वाहतूककोंडीचा फटका बसत नसला तरी परत जाताना मात्र कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे तेथील टँकरसुद्धा बंद करण्यात आल्याने पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. येथील अनेकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने पुलाच्या दुरुस्तीपुर्वी त्यांची वाहने मुंबई, ठाणे येथे दररोज तीन ते चार फेºया करीत होते. कोंडीमुळे एकच फेरी होत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे.
पुलाची दुरुस्ती लवकर पूर्ण करुन स्थानिकांना दिलासा द्यावा. तत्पूर्वी उद्भवलेल्या वाहतूककोंडीतून किमान स्थानिक विद्यार्थ्यांच्या बस तसेच पाण्याच्या टँकरला प्राधान्य दिले जावे. अनेक लोकं पुलावरुनच पायपीट करु लागले असून रात्रीच्या वेळी पूलावर अंधार असल्याने त्यांच्या जिवीताला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलावर पुरेशा उजेडाचे दिवे बसविले जावेत.
- राजेंद्र ठाकूर, समाजसेवक
वसई-विरार क्षेत्रातील पुलाच्या बाजूकडील बहुतांश विद्यार्थी आपल्या शाळेत येतात. त्यांना वाहतूककोंडीमुळे विलंब होऊ लागला आहे. वाहतूककोंडी सुसह्ण होण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे सतत पाठपुरावा केला जात असून, त्यावर सकारात्मक कारवाई होत नाही.
- केशव घरत, संस्थापक, राजा शिवाजी विद्यालय, मीरा-भाईंदर
‘आयआरबी’च्याविरोधात श्रमजीवीचे सोमवारी आंदोलन
मीरा रोड : नवीन वरसावे पुलाच्या दुरु स्तीचे काम सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे तेथे वाहतूककोंडी होत आहे. पण ही कोंडी, पोलिसांवरचा अतिरिक्त ताण तसेच इंधन आणि वेळेचा अपव्यय याला आयआरबी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सोमवारी महामार्ग प्राधिकरणाच्या वरसावे येथील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे कळवले आहे. दीड वर्षांपासून वरसावे नवीन पुलाच्या दुरुस्तीचे काम टोलवले जात आहे. दुरुस्ती महत्त्वाची असतानाही शासन यंत्रणा गंभीर नसल्याचा सूर आहे. अखेर शुक्र वारपासून दुरु स्ती सुरु झाल्याने अवजड वाहने मनोर व चिंचोटी येथून भिवंडी मार्गे वळवली आहेत. लहान वाहने नवीन पुलावरील एकेरी मार्गिकेतून सोडली जात आहे. सदर महामार्ग वर्दळीचा असल्याने ठिकठिकाणी कोंडी सुरु झाली आहे. वरसावे येथे तर वसईच्या दिशेने ३ ते ४ किमी रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडी, पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण, वाया जाणारी वेळ व इंधन याला आयआरबी जबाबदार असल्याचे सांगत नागरिकांना त्रास होतो म्हणून वरसावे येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर सकाळी ११ वा. आंदोलन करणार असल्याचे पत्र पंडित यांनी पोलिसांसह संबंधितांना दिले.